अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
श्रीगोंदा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या इन्फिनिटी बिकॉन इंडिया प्रा. लि. फसवणूक प्रकरणात करोडो रूपयांचे कमिशन लाटणारा प्रमुख एजंट विनोद बबन गाडीलकर याचा भाऊ विक्रम बबन गाडीलकर याला अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्याला सात दिवसांची (24 सप्टेंबरपर्यंत) पोलीस कोठडी दिली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सुपा परिसरातून त्याला मंगळवारी (16 सप्टेंबर) ताब्यात घेतले.
नवनाथ औताडे व त्याच्या साथीदारांनी सिस्पे, ट्रेडस, इन्फिनिटी आदी कंपन्यांच्या नावाने हजारो गुंतवणूकदारांची फसवणूक केली आहे. यासंदर्भात श्रीगोंदा, सुपा व तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. त्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे. या कंपनीचा प्रमुख एजंट असलेला विनोद गाडीलकर याने ट्रेडस ईन्वेस्टमेंट कंपनीत सुमारे 450 कोटी रूपयांची फसवणूक झाल्याप्रकरणी न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाच्या आदेशानुसार त्याच्या फिर्यादीवरून सुपा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, फिर्यादी एजंट विनोद गाडीलकर याच्यासह कुटुंबातील तिघे संशयित आरोपी असल्याचे आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासातून समोर आले होते. विनोद, विक्रम, पूजा व प्रमोद गाडीलकर अशी चौघांची नावे संशयित आरोपींमध्ये समाविष्ट झाली आहेत.
गाडीलकर कुटुंबाने स्वतः गुंतवणूक करूनच थांबले नाही, तर इतर गुंतवणूकदारांना प्रलोभन देऊन कंपनीत पैसा गुंतवण्यास भाग पाडले. त्यांनी सुपा, पारनेर, श्रीगोंदा परिसरातील हजारो गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रूपये गुंतवून घेतले. गाडीलकर कुटुंबाला यामध्ये कोट्यवधी रूपयांचे कमिशन मिळाले असल्याचे पोलिसांच्या तपासातून समोर आले आहे.
विनोद गाडीलकर व त्याच्या कुटुंबातील तिघांना आरोपी करण्यात आल्यानंतर ते पसार झाले होते. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपअधीक्षक गणेश उगले, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किरण कबाडी व तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक डॉ. शरद गोर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी संशयितांचा शोध सुरू केला.
विक्रम गाडीलकर हा सुपा परिसरात असल्याची माहिती मिळताच त्याला मंगळवारी ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. दरम्यान, सदर कंपनीकडून ज्या गुंतवणूकदारांची फसवणूक झाली आहे, त्यांनी संबंधित कागदपत्रांसह आर्थिक गुन्हे शाखेत हजर राहून जबाब नोंदवावा, असे आवाहन निरीक्षक डॉ. गोर्डे यांनी केले आहे.





