नाशिकरोड | Nashikroad
येथील करन्सी नोटप्रेस मध्ये सुमारे पाच लाख रुपयांच्या नोटा चोरीप्रकरणी पोलीस उपायुक्त विजय खरात तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त समीर शेख उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी करन्सी नोट प्रेस मध्ये जाऊन चौकशी केली.
येथील करन्सी नोट प्रेस मधून 1000 नोटा असलेले 500 चे एक बंडल 29 जून 2021 पूर्वी चोरी झाल्याची तक्रार करन्सी नोट प्रेसचे सहाय्यक व्यवस्थापक अमित शर्मा यांनी तक्रार दिल्यानंतर उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान सदरची घटना ही फेब्रुवारी महिन्यात घडली. मात्र कोरोना महामारी मुळे करन्सी नोट प्रेस दोन ते अडीच महिने बंद होता. त्यामुळे सदरची घटना लक्षात आली नाही. परंतु आता पाच लाख रुपये चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस येताच प्रेस कामगारांमध्ये व व्यवस्थापनामध्ये खळबळ उडाली आहे.
या नोटा खरंच चोरी झालेल्या आहे की याबाबत तपास सुरू आहे तसेच खराब झालेल्या नोटा प्रेसच्या आवारात जाळण्यात येतात. सदरच्या नोटा या भंगाराच्या साहित्यामध्ये जातात त्यामुळे भंगारात जाळल्या असाव्या अशी चर्चा प्रेस कामगारांमध्ये आहे, मात्र याबाबत निश्चित माहिती मिळू शकली नाही.
परिणामी आता पाच लाख रुपयांच्या नोटा चोरीप्रकरणी सदरचा तपास पोलिसांकडे गेल्याने पोलीस या चोरी प्रकरणी कसून चौकशी करत आहे. परिणामे चौकशीसाठी काही प्रेस कामगारांना ताब्यातही घेण्याची शक्यता आहे. दरम्यान या चोरीमुळे पुन्हा एकदा प्रेसच्या सुरक्षाव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.