अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
‘इन्फिनेट बेकॉन फायनान्शियल सर्व्हिसेस’ आणि ‘ट्रेडझ इन्व्हेस्टमेंट प्रा. लि’ या कंपनीतील फसवणूक प्रकरणी श्रीगोंदा व तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहे. याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेने सुरू केला असून गुंतवणूकदारांनी कागदपत्रे अगर आपणाकडे असलेल्या पुराव्यांसह आर्थिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर येथे हजर राहण्याचे आवाहन तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक डॉ. शरद गोर्डे यांनी केले आहे.
‘इन्फिनेट बेकॉन फायनान्शियल सर्व्हिसेस’ आणि ‘ट्रेडझ इन्व्हेस्टमेंट प्रा. लि’ या कंपन्यांनी नागरिकांना आर्थिक परताव्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकळले. संचालक व एजंटांनी दरमहा आकर्षक परतावा देण्याचे वचन देत लोकांकडून गुंतवणूक करवून घेतली. मात्र ठराविक कालावधी नंतर ना परतावा मिळाला, ना मूळ गुंतवणूक रक्कम परत करण्यात आली. त्यामुळे अनेक गुंतवणूकदारांची आर्थिक फसवणूक झाली आहे. यासंदर्भात श्रीगोंदा व तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या गुन्ह्यांचा तपास पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला आहे. या पार्श्वभूमीवर, आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी संबंधित कंपन्यांविरोधात सखोल तपास सुरू केला आहे.
दरम्यान, निरीक्षक डॉ. गोर्डे यांनी एक प्रसिध्दीपत्रक जारी करून, ज्या नागरिकांनी या दोन कंपन्यांमध्ये पैसे गुंतवले आहेत, त्यांनी आपली कागदपत्रे व पुरावे घेऊन आर्थिक गुन्हे शाखा, पोलीस अधीक्षक कार्यालय, अहिल्यानगर येथे तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे. फसवणूक झाल्याची शक्यता असलेल्या गुंतवणूकदारांनी अधिकार्यांना सहकार्य करावे, जेणेकरून संशयित आरोपींवर कठोर कारवाई होऊन फसवलेली रक्कम परत मिळवता येईल, असेही पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.




