Monday, June 1, 2026
Homeब्रेकिंग न्यूजIPL 2026 : GT Vs RCB : विराटच्या दमदार खेळीने बंगळुरू सलग...

IPL 2026 : GT Vs RCB : विराटच्या दमदार खेळीने बंगळुरू सलग दुसरयांदा आयपीएल चॅम्पियन

अहमदाबाद | वृत्तसंस्था

- Advertisement -


आयपीएल २०२६ च्या अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने शानदार कामगिरी करत गुजरात टायटन्स वर ५ विकेट्सने विजय मिळवला आणि सलग दुसऱ्यांदा आयपीएल विजेतेपद पटकावले. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या रंगतदार अंतिम लढतीत विराट कोहलीच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर बंगळुरूने १५६ धावांचे लक्ष्य १८ षटकांत पूर्ण केले.

नाणेफेक जिंकून बंगळुरूचा कर्णधार रजत पाटीदार याने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. गुजरातची सुरुवात अपेक्षेप्रमाणे झाली नाही. कर्णधार शुभमन गिल आणि साई सुदर्शन लवकर बाद झाल्याने संघावर दबाव निर्माण झाला.जॉस बट्लर , निशांत सिंधू आणि राहुल तेवतिया यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला, मात्र बंगळुरूच्या गोलंदाजांनी नियमित अंतराने विकेट्स घेत गुजरातला मोठी भागीदारी उभारू दिली नाही.

अडचणीत सापडलेल्या गुजरातला वॉशिंग्टन सुंदर याने एकहाती आधार दिला. त्याने ३७ चेंडूत नाबाद ५० धावांची संयमी खेळी साकारत संघाला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचवले. अखेरच्या षटकांत अर्शद खान आणि रशीद खान यांनी काही महत्त्वाचे फटके मारल्याने गुजरातने २० षटकांत ८ बाद १५५ धावा केल्या.

बंगळुरूकडून रसिख सलाम दार याने सर्वाधिक ३ बळी घेत प्रभावी गोलंदाजी केली. भुवनेश्वर कुमार आणि जोश हॅझलवुड यांनीही अचूक मारा करत गुजरातच्या फलंदाजांवर नियंत्रण ठेवले. विशेषतः मधल्या षटकांत बंगळुरूच्या गोलंदाजांनी धावगती रोखण्यात मोठे यश मिळवले.

१५६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बंगळुरूने सुरुवातीपासूनच आक्रमक भूमिका घेतली. व्यंकटेश अय्यर याने अवघ्या १६ चेंडूत ३२ धावांची तुफानी खेळी करत संघाला वेगवान सुरुवात मिळवून दिली. त्यानंतर अनुभवी विराट कोहली याने डावाची सूत्रे आपल्या हाती घेत चौफेर फटकेबाजी केली.

कोहलीने अवघ्या ४२ चेंडूत नाबाद ७५ धावांची शानदार खेळी साकारली. त्याच्या खेळीत चौकार आणि षटकारांची आतषबाजी पाहायला मिळाली. आयपीएल कारकिर्दीतील आणखी एका संस्मरणीय खेळीच्या जोरावर त्याने बंगळुरूला विजयाच्या उंबरठ्यावर आणून ठेवले. टिम डेव्हिड यानेही २४ धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले.

गुजरातकडून रशीद याने २ बळी घेत प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. कागिसो रबाडा आणि मोहम्मद सिराजयांनीही काही महत्त्वाची षटके टाकली, मात्र कोहलीच्या संयमी आणि आक्रमक फलंदाजीसमोर गुजरातचे प्रयत्न अपुरे पडले.

अखेरीस बंगळुरूने १८ षटकांत ५ बाद १६१ धावा करत ५ विकेट्सने विजय मिळवला आणि सलग दुसऱ्या वर्षी आयपीएल चषकावर नाव कोरले. या विजयासह रजत पाटीदार च्या नेतृत्वाखाली बंगळुरूने पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले.

ताज्या बातम्या

Crime News : भिंगारमध्ये तिरट जुगार अड्ड्यावर छापा

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar भिंगार परिसरातील मोमीन गल्ली ते नागरदेवळे जाणार्‍या रस्त्यालगतच्या काटवणात सुरू असलेल्या तिरट जुगार अड्ड्यावर भिंगार कॅम्प पोलिसांनी शनिवारी सायंकाळी धाड टाकून चार...