Wednesday, June 17, 2026
Homeक्रीडाIPL फायनलनंतर हादरवणारी घटना! खेळाडूंनी भरलेल्या गुजरात टायटन्सच्या टीम बसला आग, मोठा...

IPL फायनलनंतर हादरवणारी घटना! खेळाडूंनी भरलेल्या गुजरात टायटन्सच्या टीम बसला आग, मोठा अनर्थ टळला

अहमदाबाद । Ahmedabad

आयपीएल २०२६ च्या अंतिम सामन्यातील पराभवाचे दु:ख अजून ताजे असतानाच, गुजरात टायटन्स (GT) संघासोबत रविवारी रात्री एक थरारक घटना घडली. अहमदाबादच्या ऐतिहासिक नरेंद्र मोदी स्टेडियमवर अंतिम सामना खेळून हॉटेलकडे परतत असलेल्या गुजरात टायटन्सच्या टीम बसला अचानक भीषण आग लागली. बसमधील शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून, यामुळे खेळाडूंमध्ये काही काळ प्रचंड घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते.

- Advertisement -

गंभीर बाब म्हणजे, आग लागल्याचे लक्षात येताच सुरक्षारक्षक आणि व्यवस्थापनाने दाखवलेल्या तत्परतेमुळे एक मोठा अनर्थ टळला. तातडीने मदतकार्य राबवून बसमधील सर्व खेळाडू आणि सपोर्ट स्टाफला सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. सुदैवाने या दुर्घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही, परंतु सुरक्षेच्या कारणास्तव खेळाडूंना सुमारे एक तास रस्त्यावर ताटकळत उभे राहावे लागले.

रविवारची रात्र गुजरात टायटन्सच्या गोटात सर्वच पातळ्यांवर निराशा आणि चिंतेची ठरली. आधी आयपीएलच्या अंतिम महामुकाबल्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) संघाने गुजरातचा ५ विकेट्सने पराभव करत चॅम्पियनशिपवर आपले नाव कोरले. या पराभवाच्या धक्क्यातून खेळाडू सावरत नाहीत, तोच टीम बसला लागलेल्या आगीने त्यांच्या काळजाचा ठोका चुकवला.

गुजरात टायटन्सला अंतिम सामन्यापूर्वी अत्यंत कठीण आणि थकवणाऱ्या प्रवासाचा सामना करावा लागला होता. २७ मे रोजी हा संघ धरमशाला येथून मुल्लानपूरला पोहोचला, जिथे २९ मे रोजी त्यांनी राजस्थान रॉयल्सविरुद्ध क्वालिफायर २ चा सामना खेळून अंतिम फेरीत धडक मारली होती. त्यानंतर ३० मे रोजी खराब हवामानामुळे त्यांच्या अहमदाबादच्या विमानाला प्रचंड उशीर झाला. परिणामी, संघ शनिवारी उशिरा रात्री अहमदाबादला पोहोचला होता. अंतिम सामन्यात गुजरातचा संघ केवळ १५५ धावांवर आटोपला. या सुमार कामगिरीमागे सलग प्रवास आणि खेळाडूंचा थकवा हे कारण होते का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यावर गुजरात टायटन्सचे क्रिकेट संचालक विक्रम सोळंकी यांनी स्पष्ट भूमिका मांडली.

ते म्हणाले, “आरसीबीने अतिशय उत्तम खेळ केला आणि त्यांच्या विजयाचे श्रेय आम्ही कमी करू इच्छित नाही. आम्ही कमी दिवसांत जास्त सामने खेळलो आणि खेळाडू थकले होते, असे सांगून आम्ही आमच्या पराभवाचे समर्थन करणार नाही. आमची धावसंख्या नक्कीच कमी होती, परंतु आमच्या गोलंदाजांनी ती वाचवण्यासाठी चांगली झुंज दिली. आम्ही कुठे चुकलो याचे मूल्यांकन नक्कीच करू, पण काही वेळा समोरचा संघ आपल्यापेक्षा सरस खेळतो हे मान्य करावेच लागते.”

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्हा बँकेसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या प्रक्रियेचा भाग म्हणून सभासद संस्थांच्या (सेवा सोसायट्यांच्या) प्रतिनिधींचे ठराव 17...