मुंबई । Mumbai
२०२६ च्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये (IPL) कोलकाता नाईट रायडर्सची (KKR) अवस्था बिकट झाली असून संघाच्या अडचणीत आता आणखी भर पडली आहे. चेन्नई सुपर किंग्सविरुद्धच्या सामन्यात सलग चौथा पराभव पत्करावा लागल्यानंतर, बीसीसीआयने (BCCI) षटकांची गती (Slow Over Rate) कमी ठेवल्याबद्दल कोलकाताचा कर्णधार अजिंक्य रहाणेला १२ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.
चेन्नईतील एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात कोलकाताचा संघ निर्धारित वेळेत आपल्या वाट्याची षटके पूर्ण करण्यात अपयशी ठरला. आयपीएल आचारसंहितेच्या कलम २.२२ नुसार, हा या हंगामातील संघाचा पहिलाच गुन्हा असल्याने केवळ कर्णधारावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. या हंगामात स्लो ओव्हर रेटमुळे दंड सोसावा लागणारा रहाणे हा चौथा कर्णधार ठरला आहे.
यापूर्वी पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यरला दोनदा, तर शुभमन गिल (गुजरात टायटन्स) आणि हार्दिक पांड्या (मुंबई इंडियन्स) यांना प्रत्येकी एकदा असाच दंड झाला आहे. विशेष म्हणजे, नव्या नियमांनुसार आता तिसऱ्या गुन्ह्यानंतर एका सामन्याच्या बंदीची तरतूद काढून टाकण्यात आली आहे, ज्यामुळे श्रेयस अय्यरला दिलासा मिळाला होता. याच सामन्यात सनरायझर्स हैदराबादच्या अभिषेक शर्मालाही बेशिस्त वर्तनाबद्दल सामना शुल्काच्या २५ टक्के दंड आणि एक डिमेरिट पॉईंट देण्यात आला आहे.
कोलकाता नाईट रायडर्ससाठी हा हंगाम अत्यंत निराशाजनक ठरत आहे. चेन्नईविरुद्धच्या सामन्यात रहाणेची कालबाह्य रणनीती आणि मुख्य प्रशिक्षक अभिषेक नायर यांचे नियोजन अपयशी ठरल्याचे दिसून आले. दुहेरी गतीच्या खेळपट्टीवर चेन्नईने १९२ धावांचे आव्हान दिले होते. मात्र, प्रत्युत्तरात कोलकाताचा संघ २० षटकांत १६० धावांपर्यंतच मजल मारू शकला. ३२ धावांनी मिळालेल्या या पराभवामुळे कोलकाताचा संघ आता गुणतालिकेत थेट तळाला फेकला गेला आहे.




