Sunday, July 26, 2026
Homeदेश विदेशIran Missile Attack : होर्मुझच्या सामुद्रधुनीत दोन व्यापारी जहाजांवर इराणच्या क्षेपणास्त्र हल्ला;...

Iran Missile Attack : होर्मुझच्या सामुद्रधुनीत दोन व्यापारी जहाजांवर इराणच्या क्षेपणास्त्र हल्ला; भारतीय खलाशाचा मृत्यू

दिल्ली । Delhi

जागतिक व्यापाराचा कणा मानल्या जाणाऱ्या होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ मध्यपूर्वेतील तणावाने अत्यंत धोकादायक वळण घेतले आहे. ओमानच्या सागरी हद्दीत प्रवास करणाऱ्या ‘मोम्बासा’ आणि ‘अल बाहिया’ या दोन राष्ट्रीय टँकर्सवर इराणने क्रूझ क्षेपणास्त्रांद्वारे भीषण हल्ला केला. संयुक्त अरब अमिरातीच्या (UAE) संरक्षण मंत्रालयाने या वृत्ताला अधिकृत दुजोरा दिला आहे.

- Advertisement -

या अत्यंत दुर्दैवी हल्ल्यात ‘मोम्बासा’ जहाजावर कार्यरत असलेल्या एका निष्पाप भारतीय कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला असून, अन्य आठ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींमध्ये सहा भारतीय आणि दोन युक्रेनियन नागरिकांचा समावेश असून, त्यातील चौघांची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. क्षेपणास्त्र आदळल्यानंतर दोन्ही टँकर्सना भीषण आग लागली होती, ज्यामुळे जहाजांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र, अथक प्रयत्नांनंतर ही आग आता आटोक्यात आणण्यात आली आहे.

या भ्याड हल्ल्याचा संयुक्त अरब अमिरातीच्या परराष्ट्र मंत्रालयाने तीव्र शब्दांत निषेध केला आहे. आंतरराष्ट्रीय कायद्यांचे हे उघड उल्लंघन असल्याचे सांगत यूएईने म्हटले आहे की, आपल्या राष्ट्रीय हितसंबंधांच्या रक्षणासाठी ते कटिबद्ध असून, या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्याचा अधिकार त्यांनी राखून ठेवला आहे. यूएईने या हल्ल्यात प्राण गमावलेल्या भारतीय खलाशाच्या कुटुंबीयांप्रति आणि भारत सरकारप्रति तीव्र शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत.

व्यापारी जहाजांना लक्ष्य करणे आणि जागतिक आर्थिक दबावासाठी होर्मुझच्या सामुद्रधुनीचा वापर करणे ही निव्वळ समुद्री चाचेगिरी आहे. यामुळे जागतिक ऊर्जा सुरक्षा आणि प्रादेशिक शांततेसाठी थेट धोका निर्माण झाला आहे, असे यूएईने आपल्या निवेदनात स्पष्ट केले. तसेच इराणने हे अकारण हल्ले तातडीने थांबवून होर्मुझची सामुद्रधुनी आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी बिनशर्त खुली करावी, अशी मागणी केली आहे.

इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने (IRGC) होर्मुझची सामुद्रधुनी बंद केल्यानंतर अमेरिका आणि इराणमधील वाद टोकाला पोहोचला आहे. अमेरिकेने यापूर्वीच प्रत्युत्तरादाखल इराणमधील १४० ठिकाणांवर भीषण हल्ले केले होते. या ताज्या घडामोडीनंतर अमेरिकेने इराणच्या बंदरांकडे जाणारी आणि तेथून येणारी सागरी वाहतूक पूर्णपणे रोखण्याची घोषणा केली आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एका महत्त्वाच्या कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी केल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, “होर्मुझच्या सामुद्रधुनीतील ही नौदल नाकेबंदी प्रामुख्याने इराणला लक्ष्य करण्यासाठी आहे. इतर देशांच्या व्यापारी जहाजांना या सामरिक जलमार्गातून सुरक्षित दळणवळणाची पूर्ण परवानगी असेल. ही नाकेबंदी केवळ इराणशी व्यापार करणाऱ्यांना लागू होईल.” या वाढत्या तणावामुळे जागतिक बाजार्टात इंधनाचे दर भडकण्याची शक्यता निर्माण झाली असून संपूर्ण जगाचे लक्ष आता या परिसराकडे लागले आहे.

ताज्या बातम्या

Bhandardara : निळवंडेही ओव्हरफ्लो; मुळात 9541 क्युसेकने विसर्ग

0
भंडारदरा |वार्ताहर| Bhandardara पाणलोटात आषाढ सरींचे तांडव सुरूच असून उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या भंडारदरा धरणातून पाणी सोडल्यानंतर आता निळवंडे धरणही काल ओव्हरफ्लो झाले. भंडारदरातून...