अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
निलक्रांती चौकाजवळील हनुमान पान शॉपवर सोमवारी रात्री हिंसक हल्ल्याची घटना घडली. दुचाकी आडवी लावल्याच्या किरकोळ वादातून ऋतीक साळवे व त्याच्या साथीदारांनी अभिषेक साखरे आणि चेतन बनसोडे यांना लाथा-बुक्क्यांनी आणि लोखंडी रॉडने मारहाण केली. चेतनवर हल्ला होऊन तो बेशुद्ध पडला असल्याने त्याला सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. पोलिसांनी दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतले असून, तिघे पसार आहेत.
अभिषेक साखरे (वय 20, रा. दातरंगे मळा) याने फिर्यादीत म्हटले की, तो व चेतन बनसोडे (वय 19, रा. वारुळाचा मारुती) रात्री 9 वाजता मित्रांसोबत गप्पा मारत होते. पान घेण्यासाठी चेतनच्या दुचाकीवर निघाले असता, दिल्लीगेट रोडवर एका व्यक्तीने त्यांना शिवी दिली. चेतनने माफी मागून पुढे निघाले. हनुमान पान शॉपवर पान खात असताना ऋतीक साळवे दुचाकीवर आला आणि चेतनची दुचाकी आडवी लावली. ऋतीकने चेतनला मित्रांशी बोलल्याचा जाब विचारला. चेतनने स्पष्टीकरण दिले, पण तेवढ्यात अमोल पाडळे, अक्षय पवार, रुपेश गायकवाड आणि निखील साळवे धावत आले. अमोलने अभिषेकच्या तोंडावर जोरदार बुक्का मारला, ज्यामुळे त्याचे नाक फुटले. अमोलच्या हातात लोखंडी रॉड होता.
पाचही जणांनी अभिषेक आणि चेतनला मारहाण केली. अभिषेकने चेतनला वाचवण्याचा प्रयत्न केला, पण अमोलने रॉडने चेतनच्या डोळ्याजवळ आणि डोक्यावर वार केले. चेतन बेशुद्ध पडला, तरीही त्याला लाथांनी तुडवले गेले. अभिषेकने चेतनला मिठी मारून वाचवले. यावेळी एका पोलिस कर्मचार्याने धावत येऊन दोन संशयित आरोपींना पकडले, पण इतर तिघे पळून गेले.अभिषेकने मित्र पियुष उंबरवालला फोन करून घटना सांगितली. पियुष आणि अभिजीत आल्हाट यांनी चेतनला तात्काळ सिव्हील हॉस्पिटलला नेले.
पोलिसांनी अमोल पाडळे, ऋतीक साळवे, अक्षय पवार, रुपेश गायकवाड आणि निखील साळवे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हे सर्व निलक्रांती चौकाजवळ राहणारे आणि ऋतीकचे मित्र आहेत. पोलिसांनी तपास सुरू केला असून, पसार संशयित आरोपींचा शोध घेतला जात आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.





