अकोले |प्रतिनिधी| Akole
अकोले (Akole) तालुक्यातील डोंगरगावच्या गुंजाळ वस्तीवर शनिवारी रात्री घडलेल्या थरारक घटनेत एका चार वर्षीय बालिकेवर बिबट्याने हल्ला (Leopard Attack) करून तिला जखमी केले. मात्र, वडील मनोज गुंजाळ यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता बिबट्याशी झुंज देत मुलीची सुटका केली. त्यानंतर जीव वाचविण्यासाठी धावत असताना अंधारामुळे बाप-लेकींचा तोल जाऊन ते खोल विहिरीत पडले. ग्रामस्थांच्या तत्परतेमुळे दोघांनाही सुखरूप बाहेर काढण्यात आले असून त्यांच्यावर सध्या संगमनेर (Sangamner) येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अवनी मनोज गुंजाळ असे जखमी बालिकेचे नाव आहे.
डोंगरगाव (Dongargaon) शिवारात शुक्रवारी रात्री ही अंगावर शहारे आणणारी घटना घडली. अवनी तिच्या आईसोबत असताना दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक तिच्यावर झडप घातली. बिबट्याने अवनीला जबड्यात पकडून अंधाराच्या दिशेने ओढण्यास सुरुवात केली. मुलीच्या (Girl Child) आईचा आरडाओरडा ऐकून जवळच असलेले वडील मनोज गुंजाळ धावून आले. त्यांनी धाडसाने बिबट्याशी (Leopard) सामना करत मुलीची सुटका केली. जखमी अवस्थेतील अवनीला कडेवर घेऊन ते घराच्या दिशेने धावू लागले. मात्र, दाट अंधारामुळे वाटेत असलेल्या विहिरीचा अंदाज न आल्याने दोघेही विहिरीत पडले.
प्रसंगावधान राखत मनोज गुंजाळ यांनी मुलीला सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न केला. विहिरीत पडल्याचा आवाज आणि कुटुंबीयांचा आक्रोश ऐकून ग्रामस्थ घटनास्थळी धावले. त्यांनी दोघांनाही विहिरीतून बाहेर काढून तत्काळ उपचारासाठी संगमनेर (Sangamner) येथे हलविले. घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच रुग्णालयात जाऊन जखमी बाप-लेकींची विचारपूस केली. दरम्यान, डोंगरगाव परिसरात बिबट्याचा वारंवार वावर असूनही वन विभागाकडून प्रभावी उपाययोजना होत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी तातडीने पिंजरा लावावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.




