श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
श्रीरामपूर नगरपालिका प्रशासनापाठोपाठ आता पाटबंधारे विभागानेही आपल्या हद्दीतील अतिक्रमण काढण्यासाठी कंबर कसली आहे. शहरात कॅनॉलच्या कडेच्या सर्व अतिक्रमण धारकांना पाटबंधारे विभागाने नोटिसा बजावल्या आहेत. शहरातील सुमारे दीड हजारांच्या वर तर अशोकनगर परिसरात दिडशे ते दोनशे अतिक्रमणधारक पाटबंधारे खात्याच्या रडारवर आले आहेत. त्यामुळे आता आपलेही अतिक्रमण निघणार या भितीने अनेक व्यावसायिक धास्तावले आहेत.
मागील काही दिवसांपासून शहरात नगरपालिका प्रशासनाकडून प्रमुख रस्त्यांवरील अतिक्रमणे काढण्याचे काम सुरू असताना, मागील दोन ते तीन दिवसांपासून पाटबंधारे विभागही अतिक्रमण काढण्यासाठी अॅक्शन मोडवर आला आहे.
हे अतिक्रमण काढण्याबाबत वरिष्ठ पातळीवरून अद्याप काही आदेश आलेले नाही, असे समजते. तसेच अशोकनगर भागातही अनेक दुकाने, घरकुले पाटबंधारे विभागाच्या जागेमध्ये बांधण्यात गेलेली आहे. त्यांनाही नोटीसा बजविण्यात आल्या आहेत.
तोडगा काढण्याची मागणी
शहरातून जाणार्या दोन्ही कालव्यांलगतची काही ठिकाणची जागा पाटबंधारे विभागाकडून पालिकेने भाडेकराराने घेतलेली आहे, असे गाळेधारकांचे म्हणणे आहे. याठिकाणी घरकुले व व्यापारी संकुले उभाण्यात आली. येथील काही व्यावसायिक पालिकेला भाडेपट्टाही देतात. काही देत नाहीत. असे असलेतरी हा शासनाच्या दोन विभागांतर्गत विषय आहे. ही दुकाने उद्ध्वस्त झालीतर अनेकजणांपुढे भवितव्याची चिंता राहणार आहे. यासंदर्भात दुकानदारांची बाजू ऐकून लोकप्रतिनिधी आणि पाटबंधारे तोडगा विभागाने काढावा अशी मागणी होत आहे.
या भागात बजावल्या नोटिसा
शहरातील सैलानी बाबा दर्गाह परिसर, सुयोग मंगल कार्यालयासमोरील भाग, गिरमे चौक परिसर, श्रीसिध्दीविनायक मंदिरासमोरील मार्केट तसेच सरस्वती कॉलनीकडे जाणार्या कॅनॉलच्या बाजूने झालेले अतिक्रमण तसेच भंडारदरा धरणाच्या आवर्तनासाठी शहरात बेलापूर रस्त्याकडे व गोंधवणी रस्त्याकडे असे दोन कालवे जातात. या दोन्हीही कालव्यांच्या कडेला असलेल्या अतिक्रमण धारकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. पाटबंधारे विभागाच्या काही भागात पालिकेने घरकुलेही बांधलेली आहे, तसेच अवैध वराह पैदास केंद्रही सुरू आहे. या सर्व बाबींकडे पाटबंधारे विभागाने डोळेझाक केली होती. मात्र, आता सरकारी जागेवरील अतिक्रमण काढण्यासाठी राज्य सरकारनेच प्राधान्य दिल्याने पाटबंधारे विभााने अतिक्रमण धारकांना नोटिसा बजावल्या आहेत.