नंदुरबार – Nandurbar – प्रतिनिधी :
धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील २२ उपसा सिंचन योजनाच्या कामाला गती देण्याचे लेखी आश्वासन जिल्हा प्रशासनाने दिल्याने उपसा सिंचन योजना संघर्ष समितीचे जलसमाधी आंदोलन स्थगित करण्यात आले आहे.
तरीही सदर योजना तात्काळ कार्यान्वित न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे.धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील २२ उपसा सिंचन योजना कार्यान्वित करण्यासाठी उपसा सिंचन योजना संघर्ष समितीच्यावतीने आज दि.१ रोजी जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता.
त्यानुसार नंदुरबार व धुळे जिल्हा पाणी पुरवठा संस्थांचे १२ पदाधिकारी सातपुडा साखर कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिजाबराव गोरख पाटील, विजय महेंद्रलाल गुजराथी, यशवंत लिमजी पाटील, राजाराम दगडू पाटील, रविंद्र उत्तम पाटील, संजय लक्ष्मण पाटील, रितेश खेमराज बोरसे, विनोद चिंतामन पाटील, राजाराम सखाराम चौधरी, यशवंत जगन्नाथ पाटील, रविंद्र शंकर पाटील व राजेंद्र विलास पाटील हे आज जलसमाधी घेणार होते. यापार्श्वभूमीवर परिसरात चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
शेतकरी जलसमाधीसाठी जात असतांना त्यांना रोखण्यात आले. यावेळी धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील ५९ गावातील सुमारे १६ हजार शेतकऱ्यांची १४ हजार ४५९ हेक्टर शेतजमीन सिंचनाखाली येणार असल्याने २२ उपसा सिंचन योजनेच्या दुरुस्ती व बांधकामासाठी सुमारे ११५ कोटी रुपयांची गरज भासणार आहे.
यासाठी सुधारीत प्रस्ताव शासन दरबारी मान्यतेसाठी पाठविण्यात आला असून त्यास जलसंपदा, नियोजन व अर्थ विभागाची मंजूरी मिळाल्यास काम तात्काळ पूर्णत्वास नेण्यात येईल, असे आश्वासन कार्यकारी अभियंता तुषार चिनावलकर यांनी दिले.
दरम्यान, आ.राजेश पाडवी, सातपुडा साखर कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील, आंदोलनकर्ते शेतकरी व प्रांताधिकारी चेतन गिरासे, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता तुषार चिनावलकर, तहसीलदार मिलींद कुळकर्णी, पोलिस निरीक्षक दीपक बुधवंत, दिलीप पाटील आदींच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली.
यावेळी दीपक पाटील यांनी मध्यस्थी केली. प्रशासनाकडून पाठपुरावा करण्यात येत असून तात्काळ कामास सुरुवात करण्यात येणार असल्याचे आश्वासन मिळाल्याने आंदोलन तूर्त स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र काम सुरु न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.




