नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
इस्राइल आणि इराण यांच्यात गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या संघर्षात दोन्ही देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यात इस्राइलने इराणमधील मोठे शास्त्रज्ञ आणि लष्करी अधिकाऱ्यांना लक्ष्य करत त्यांची हत्या केली आहे. आता इस्रायलने इराणला आणखी एक धक्का दिला आहे. इस्रायली सैन्याने (IDF) मंगळवारी इराणच्या सशस्त्र पथकांचा नवनियुक्त चीफ ऑफ स्टाफ आणि वरिष्ठ सैन्य कमांडर अली शादमानीला ठार मारल्याचा दावा केला आहे. पाच दिवसात दुसऱ्यांदा युद्धकाळातील इराणच्या चीफ ऑफ स्टाफचा मृत्यू झाला आहे. इराणसाठी हा मोठा धक्का आहे. शादमानी इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांचे जवळचते सैन्य सल्लागार होते.
आयडीएफने शादमानी यांच्या मृत्यूबाबत अधिक माहिती देताना सांगितले की, इस्राइली हवाई दलांनी सोमवार आणि मंगळवारदरम्यान रात्री तेहरानमधील सेंट्रल भागात केलेल्या हल्ल्यामध्ये शादमानी हे मारले गेले आहेत. हा हल्ला इस्राइलच्या गुप्तचर विभागाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर करण्यात आला.
IDF नुसार, शादमानी इराणच्या सशस्त्र सैन्याच्या आपातकालीन कमांड आणि खातम अल-अनबिया मुख्यालयाचे कमांडर होते. इस्लामिक रिवॉल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) आणि इराणी सैन्य दोघांच नेतृत्व करत होते. इस्रायल विरुद्ध इराणच्या युद्ध प्लानला आकार देण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका होती. दरम्यान, १२ जून रोजी इस्राइली सुरक्षा दलांनी ऑपरेशन रायझिंग लायनची सुरुवात केल्यावर सुरुवातीलाच मेजर जनरल गोलाम अली रशिद यांची हत्या केली होती. त्यानंतर शादमानी यांची चीफ ऑफ स्टाफपदी नियुक्ती करण्यात आली होती. शादमानी यांचा मृत्यू इराणी सैन्याच्या रचनेसाठी एक गंभीर झटका आहे. इस्रायलने आपल्या रणनितीद्वारे इराणची सैन्य रचनाच हलवून टाकलीय.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




