Sunday, June 14, 2026
Homeमुख्य बातम्याDadar Kabutar Khana : 'गरज पडली तर शस्त्रंही उचलू, आमच्या धर्माविरोधात…', कबुतरखान्याच्या...

Dadar Kabutar Khana : ‘गरज पडली तर शस्त्रंही उचलू, आमच्या धर्माविरोधात…’, कबुतरखान्याच्या मुद्यावरून जैन मुनींचा इशारा

मुंबई । Mumbai

मुंबईतील कबुतरखान्यांच्या परिसरात पक्ष्यांना खाणे टाकण्यावर उच्च न्यायालयाने घातलेली बंदी कायम ठेवताच जैन समाजात तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. न्यायालयाच्या आदेशानंतरही दादर कबुतरखान्याजवळ काही जैन बांधवांनी पक्ष्यांना खाद्य टाकल्याचा प्रकार समोर आला. पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करत कारवाई केली. या पार्श्वभूमीवर जैन समाजाने १३ ऑगस्टपासून उपोषणासह आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

- Advertisement -

जैन मुनी निलेशचंद्र विजय यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “कबुतरखाना बंद करण्याच्या निर्णयाला आम्ही मान्य करणार नाही. १३ तारखेला देशभरातील जैन बांधव मुंबईत येऊन उपोषण करतील. हा केवळ माझा एकट्याचा लढा नसेल, तर १० लाख जैन बांधवांचा एकत्रित संघर्ष असेल.” त्यांनी पुढे इशारा दिला की, जैन समाज हा शांतताप्रिय असला तरी धर्मावर आघात झाल्यास तो मागे हटणार नाही. “गरज पडल्यास आम्ही धर्मासाठी शस्त्रसुद्धा उचलू. आम्ही भारताचे संविधान, न्यायालय आणि सरकारचा आदर करतो; परंतु आमच्या धार्मिक श्रद्धेविरोधात निर्णय घेतला, तर कोर्टालाही मानणार नाही,” असेही त्यांनी ठामपणे सांगितले.

मुंबईतील कबुतरखान्यांवर बंदी घालण्यामागील कारण म्हणून न्यायालयाने आरोग्यविषयक धोके आणि स्वच्छतेचा मुद्दा मांडला होता. मात्र, जैन समाजाच्या मते, हा निर्णय त्यांचा ‘जीव दया’ या धार्मिक तत्त्वांवर थेट आघात आहे. “मुंगीपासून ते हत्तीपर्यंत कोणताही जीव मरता कामा नये, हे आमच्या धर्मात स्पष्ट लिहिले आहे. मग कबुतरांना अन्न का देऊ नये? दारू व मांसाहारामुळे किती लोक मरतात, त्यावर कोणी कारवाई करत नाही,” असा सवाल निलेशचंद्र विजय यांनी उपस्थित केला.

त्यांनी असेही सांगितले की, पक्ष्यांना खाद्य टाकण्यासाठी पालिकेकडे अधिकृत परवानगी मागण्यात आली आहे. परंतु सरकारकडून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा मुद्दा राजकीय पद्धतीने हाताळला जात आहे, असा आरोप त्यांनी केला. “कबुतरं मरता कामा नयेत, हेच आमचं तत्त्व. सरकारच्या आदेशानंतर काही ठिकाणी खाद्य टाकणं पुन्हा सुरू झालं आहे. पण आता आम्ही शांत बसणार नाही,” असे ते म्हणाले. या वक्तव्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पुढील काही दिवसांत या प्रकरणावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि ठाकरे गट कोणती भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ताज्या बातम्या

शेत रस्त्याच्या वादातून तरुणास मारहाण

0
मानूर | वार्ताहर Manur कळवण तालुयातील भादवण शिवारात शेतजमिनीच्या वहिवाट रस्ता वादातून एका तरुणासह त्याच्या वडिलांना मारहाण केली. यामुळे मारहाण झालेल्या युवकाने विष घेत आत्महत्या...