Monday, July 27, 2026
Homeब्रेकिंग न्यूजऔषध निरीक्षक पेपरफुटी प्रकरणात मोठा ट्विस्ट, तक्रारीचा ई-मेल बनावट? MPSC मधून धक्कादायक...

औषध निरीक्षक पेपरफुटी प्रकरणात मोठा ट्विस्ट, तक्रारीचा ई-मेल बनावट? MPSC मधून धक्कादायक माहिती समोर

मुंबई | Mumbai
देशभरात गाजलेल्या नीट (NEET) पेपरफुटी (Paper Leak) प्रकरणानंतर महाराष्ट्रात महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत घेण्यात आलेल्या औषध निरीक्षक भरती प्रक्रियेवर गंभीर आरोप झाले होते. राज्यात २२ मार्च रोजी घेण्यात आलेल्या औषध निरीक्षक भरती परिक्षेचा (Drug Inspector Paper Leak) पेपर फुटल्याच्या चर्चेने एकच खळबळ उडाली होती. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी पत्रकार परिषद घेऊन पेपर कसा फुटला याबाबत प्रेझेंटेश सादर केले. मात्र, आता या प्रकरणाला नवे आणि धक्कादायक वळण मिळाले आहे. भरती प्रक्रियेत पेपरफुटी झाल्याची तक्रार करणाऱ्या व्यक्तीनेच ती तक्रार बनावट असल्याचा दावा ई-मेलद्वारे केल्याची (Fake E-Mail) माहिती समोर आली आहे. त्यामुळे संपूर्ण प्रकरणाबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

नेमका काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, औषध निरीक्षक पदासाठी २२ मार्च रोजी ऑफलाइन परीक्षा पार पडली होती. या परीक्षेचा निकाल १२ जून रोजी जाहीर झाला. तर १ ते २१ जुलै दरम्यान उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. २२ जुलै रोजी अंतिम निवडीची यादी प्रसिद्ध झाल्यानंतर, लागलीच २३ जुलै रोजी MPSC कडे ईमेलद्वारे पेपरफुटीबाबतची एक तक्रार प्राप्त झाली. काही उमेदवारांचे गुण संशयास्पदरीत्या वाढल्याचा तसेच गुणपत्रिका आणि अंतिम निवडीत विसंगती असल्याचाही दावा करण्यात आला होता.

- Advertisement -

चौकशीचे आदेश
पेपर फुटीची तक्रार प्राप्त होताच एमपीएससीने तक्रारदाराला सर्व उपलब्ध पुरावे सादर करण्यास सांगितले. तसेच संबंधित उमेदवार आणि तक्रारदार यांना प्रत्यक्ष चौकशीसाठी आयोगासमोर हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले. आज या सर्वांची चौकशी करण्यात येत असून त्यांच्या जबाबांच्या आधारे पुढील निर्णय घेतला जाणार आहे.

Rohit Pawar: पैसे दिल्यानंतर व्हॉट्स ॲपवर प्रश्न पाठवायचा मग…; रोहित पवारांनी MPSC औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर कसा फुटला, सगळंच सांगितलं

तक्राररदारचा घुमजाव, तक्रार बनावट असल्याचे मान्य
एमपीएससीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आज चौकशीसाठी विद्यार्थी उपस्थित राहणार असतानाच काल रात्री त्याच तक्रारदाराने MPSC ला पुन्हा एक नवा ईमेल पाठवला. या ईमेलमध्ये त्याने आधी केलेली तक्रार पूर्णपणे बनावट असल्याचे मान्य केले. “पुन्हा लवकर परीक्षा होणार नाही, म्हणून पेपर फुटल्याची बतावणी केली आणि फेरपरीक्षा घेता यावी यासाठी हा सर्व बनाव रचला,” असा धक्कादायक खुलासा तक्रारदाराने स्वतःच या ईमेलमध्ये केला आहे. 20 मार्च रोजी कथित संभाषण झालेल्या घटनेची तक्रार 24 जुलैपर्यंत इतक्या विलंबाने का झाली, याचाही तपास केला जात आहे.

यापूर्वी तक्रारदारांनी एमपीएससी आणि अन्न व औषध प्रशासन (FDA) यांच्याकडे लेखी तक्रार करून परीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिका आणि उत्तरे व्हॉट्सअॅपवर व्हायरल झाल्याचा आरोप केला होता. तसेच व्हॉट्सअॅपवरील संभाषण, कॉल रेकॉर्ड आणि इतर डिजिटल पुरावे यांची फॉरेन्सिक तपासणी करून संपूर्ण भरती प्रक्रियेची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी केली होती. मात्र, आता तक्रारदारानेच तक्रार बनावट असल्याचा दावा केल्यामुळे हे प्रकरण अधिकच गुंतागुंतीचे झाले आहे. चौकशीनंतरच नेमकी वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.

दरम्यान, २० मार्च रोजी संभाषण झाल्याचा दावा केला जात असताना, तब्बल चार महिन्यांनंतर म्हणजेच २४ जुलैच्या सुमारास ही तक्रार MPSC कडे इतक्या विलंबाने का दाखल झाली? याचाही कसून तपास MPSC कडून केला जात आहे. काल आलेला ईमेल आणि चौकशीसाठी बोलावलेले विद्यार्थी या सर्वांची सखोल चौकशी सुरू असून, या प्रकरणातून नक्की काय निकाल लागणार याकडे आता स्पर्धा परीक्षा देणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.

ताज्या बातम्या