जळगाव | प्रतिनिधी| Jalgaon
शहरातील पिंप्राळा हुडको परिसरातील भीमनगर भागात मुकेश शिरसाठ खूनप्रकरणी संशयित आरोपी सतीष जुलाल केदार, प्रकाश शंकर सोनवणे यांच्यासह पाच आरोपींना सोमवारी जळगाव न्यायालयात हजर केले असता न्यायाधीश व्ही.एम.देशमुख यांनी सर्व आरोपींना 27 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तर एका अल्पवयीन आरोपीची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे.
गेल्या चार वर्षांपूर्वी पळुन जावून प्रेमविवाह केल्याच्या वादातून मुकेश रमेश शिरसाठ (वय 26,रा. हुडको, पिंप्राळा) या तरुणाचा रविवार, दि.19 जानेवारी रोजी कोयता व चॉपरने वार करुन खून केला होता. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून रविवारी एलसीबीच्या पथकाच्या जलद तपासातून सतीष जुलाल केदार (वय 42), प्रकाश शंकर सोनवणे (वय 29), सुरेश भुताजी बनसोडे (वय 47), अश्विन सुरवाडे यांना अटक करण्यात आली. तसेच रामानंदनगर पोलिसांनी विशाल उर्फ बल्या राजु गांगले (वय 25) याला धुळे येथुन अटक केली होती.तर एक अल्पवयीन आरोपीस ताब्यात घेतले आहे.
दरम्यान, संशयित आरोपी सतीष केदार, प्रकाश सोनवणे यांच्यासह पाच संशयित आरोपींना पोलीस बंदोबस्तामध्ये सोमवार, दि.20 जानेवारी रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास जळगाव न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायाधीश व्ही.एम.देशमुख यांच्या न्यायालयात तपासाधिकारी तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल पाटील यांनी या गुन्ह्याची व्याप्ती मांडून युक्तीवाद केला. तसेच अन्य संशयितांचा शोध घेण्याकामी या संशयितांना पोलीस कोठडी मिळावी,अशी विनंती न्यायालयाला केली. तर संशयित आरोपींतर्फे ऍड. अकील इस्माईल यांनी युक्तीवाद केला. न्यायालयाने दोन्ही पक्षांची बाजू ऐकून घेत पाच आरेपींनी 27 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. तर एका अल्पवयीन आरोपीला बाल न्यायमंडळात हजर केले असता त्याची बाल सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. या घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल पाटील करीत आहे.