
पुणे | प्रतिनिधी Pune
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते पुणे- साईनगर शिर्डी एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवून रेल्वेसेवेचा शुभारंभ करण्यात आला. पुण्याची मोठी लोकसंख्या पाहता येथे मेगा टर्मिनस उभारणीच्या कामाला प्रारंभ करण्यात येत आहे. यासह पुणे रेल्वे स्थानक येथे ६ नवीन प्लॅटफॉर्म बनविण्यात येणार असून अस्तित्वातील ६ प्लॅटफॉर्मची लांबी वाढविण्यात येणार असल्याने रेल्वे हाताळणीची क्षमता दुप्पट होईल, अशी माहिती रेल्वेमंत्री वैष्णव यांनी यावेळी दिली.
पुणे रेल्वे स्थानकात यार्डची रिमॉडेलिंगची पायाभरणी यावेळी वैष्णव यांच्या हस्ते करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार दूरदृष्य प्रणालीद्वारे या कार्यक्रमात सहभागी झाले. पुणे स्थानक येथे केंद्रीय नागरी विमानवाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे, आमदार विवेक कोल्हे, मध्य रेल्वेचे महाप्रबंधक राजीव श्रीवास्तव, पुणे विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक राजेश कुमार वर्मा आदी यावेळी उपस्थित होते.
केवळ पुणे जंक्शनच नव्हे तर पुणे परिसरातील खडकी, पुणे, हडपसर, शिवाजीनगर, घोरपडी, हडपसर, फुरसुंगी, आळंदी या सर्व क्षेत्राला केंद्रस्थानी ठेऊन रेल्वेचा विकास करण्यात येत आहे, असे सांगून श्री. वैष्णव म्हणाले, पुण्याची लोकसंख्या ७० लाखाच्या वर असल्याने येथे एक मेगा कोचींग टर्मिनलची आवश्यकता आहे. त्यामुळे रेल्वेच्या आळंदी येथील जागेवर मेगा टर्मिनलचे काम हाती घेतले असून नवीन ९ प्लॅटफॉर्म बनविण्यात येणार आहेत. तसेच तसेच मालवाहतुकीच्या ७ फ्रेटलाईन्स, १७ स्टॅबलिंग लाईन बनविण्यात येत आहेत. फुरसुंगी येथे नवीन ५ स्टॅबलिंग लाईन्स तयार करण्यात येत आहेत, असेही त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, पुण्यात ६०० कोटी रुपयांच्या विकास कामांतर्गत ६ प्लॅटफॉर्म नवीन बनविण्यात येणार असून अस्तित्वातील ६ प्लॅटफॉर्मची लांबी वाढविण्यात येणार आहे. याप्रकारे १२ प्लॅटफॉर्म होतील. पुणे रेल्वे स्थानक येथील रेल्वेचे कार्यान्वयन अर्थात ऑपरेशन कंट्रोल जुन्या प्रणालीवर असून त्याऐवजी पूर्णतः डिजिटल प्रणालीवर होणार आहे.
पुणे रेल्वे स्थानकात प्रवेशासाठी सध्या दोन ठिकाणे (एंट्री) असून तिसरी एन्ट्री तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे गर्दीचे नियमन योग्य प्रकारे होऊ शकेल. आळंदी येथे मेगा कोचिंग टर्मिनल बनल्यामुळे गाड्याच्या स्वच्छता, देखभाल दुरुस्तीचे काम पुण्यातून तेथे स्थलांतरीत होईल. त्यामुळे आळंदी येथून आवश्यक ती स्वच्छता, देखभाल आदी तयारी होऊन रेल्वेगाड्या पुणे रेल्वे स्थानकाची रेल्वे हाताळणीची क्षमता दुप्पट होणार असून येथून अतिरिक्त २० गाड्या चालविल्या जाऊ शकतील. हे काम येत्या ३ वर्षात पूर्ण केले जाईल, अशी माहितीदेखील मंत्री वैष्णव यांनी यावेळी दिली.




