Friday, May 3, 2024
Homeजळगावपाच दुचाकींसह चोरट्यांना शहर पोलिसांकडून अटक

पाच दुचाकींसह चोरट्यांना शहर पोलिसांकडून अटक

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून पाच दुचाकी चोरणार्‍या शाहरुख जहूर खाटीक (वय-25, रा.तांबापुर) आणि फारुख शेख मुस्तफा (वय-32,रा. राजा कॉलनी) दोन संशयितांना तांबापुर्‍यातून अटक केली आहे. दोघांकडून चोरलेल्या पाचही दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत.

- Advertisement -

सुरेश यशवंत देशपांडे (वय-25) रा. महाबळ रोड, संभाजी नगर हे 11 मे 2020 रोजी सकाळी 7 वजाता लस घेण्यासाठी शहरातील छत्रपती शाहू महाराज लसीकरण केंद्रावर दुचाकी (एमएच 19 एझेड 9087) ने आले होते. ही दुचाकी लसीकरण केंद्रासमोर पार्किंगला लावली होती.

अज्ञात चोरट्यांनी ही दुचाकी लांबविली होती. देशपांडे यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या पथकाने केली अटक

या दुचाकी चोरीचा तपास करीत असताना शहर पोलीस ठाण्याचे तेजस मराठे, अक्रम शेख व भास्कर ठाकरे यांना तांबापुरातील एक तरुण रावेर तालुक्यात जाऊन फायनान्स कंपनीच्या नावाने दुचाकी विक्री करीत असल्याची गुप्त माहिती मिळाली.

त्यानुसार पोलीस निरीक्षक धनंजय येरुळे, हवालदार विजय निकुंभ, अक्रम शेख, तेजस मराठे, भास्कर ठाकरे, उमेश भांडारकर, प्रफुल्ल धांडे, प्रणेश ठाकूर, योगेश इंधाटे, राजकुमार चव्हाण व गणेश पाटील यांच्या पथकाला संशयिताचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या. या पथकाने सर्वात आधी शाहरुख खाटीक याला ताब्यात घेतले. त्याच्याजवळ शाहू नगरात चोरी झालेली दुचाकी आढळली.

पोलीसी खाक्या दाखविल्यानंतर त्याने फारुख शेख याचे नाव सांगितले. जिल्हा पेठ व एमआयडीसी हद्दीतून प्रत्येकी दोन व शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक अशा पाच दुचाकी चोरल्याची कबुली दिली.

रावेरातून विक्री केल्या चोरलेल्या दुचाकी

संशयित दोघांनी आपण फायनान्स कंपनीत कामाला आहोत. ज्या लोकांनी कर्ज भरले नाही, त्यांच्याकडून या दुचाकी जप्त करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे कमी किमतीत विक्री करीत असल्याचे सांगून सात ते आठ हजारात या दुचाकी विक्री केल्या.

पोलिसांनी या सर्व दुचाकी जप्त करुन शहर पोलीस ठाण्यात आणल्या. या दुचाकींचे मालकही निष्पन्न करण्यात आले. तपास अक्रम शेख करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या