Sunday, September 6, 2026
Homeब्रेकिंग न्यूजGulabrao Patil : "भाजप पक्ष फोडतो, तसे शिक्षकांनी..."; मंत्री गुलाबराव पाटलांच्या 'त्या'...

Gulabrao Patil : “भाजप पक्ष फोडतो, तसे शिक्षकांनी…”; मंत्री गुलाबराव पाटलांच्या ‘त्या’ विधानाची चर्चा, नेमकं काय म्हणाले?

जळगाव | Jalgaon

- Advertisement -

शिक्षकांनी इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधील विद्यार्थी फोडून त्यांना मराठी शाळांमध्ये प्रवेश मिळवून दिला पाहिजे, असा मिश्कील टोला राज्याचे पाणीपुरवठा मंत्री आणि जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील (Minister Gulabrao Patil) यांनी लगावला आहे. जळगाव जिल्हा परिषदेतर्फे आयोजित ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ सोहळ्यात ते बोलत होते.मराठी शाळांची घटती पटसंख्या आणि पालकांचा इंग्रजी माध्यमांकडे वाढणारा कल या विषयावर बोलताना त्यांनी थेट भाजपच्या पक्षफुटीच्या राजकारणाची उपमा दिल्याने शैक्षणिक व राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.

हम दो हमारे दो, इंग्लिश मे जाने दो

पालकांच्या मानसिकतेवर भाष्य करताना गुलाबराव पाटील म्हणाले की, “जसे भाजप (BJP) इतर पक्षांचे नेते आपल्याकडे ओढून घेते, अगदी त्याच धर्तीवर शिक्षकांनीही इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांना मराठी शाळांकडे वळवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.हल्लीच्या पालकांची मानसिकता ‘हम दो, हमारे दो और इंग्लिश मे जाने दो’ अशी झाली आहे. इंग्रजीचे महत्त्व आणि आधुनिक सुविधांमुळे जिल्हा परिषदेच्या मराठी शाळांसमोर (School) पटसंख्या टिकवण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे, असे त्यांनी म्हटले.

शिक्षक हेच भविष्याचे शिल्पकार

स्पर्धेच्या युगात केवळ प्रवेश वाढवणे पुरेसे नसून शिक्षणाचा दर्जा, सुविधा आणि पालकांशी संवाद सुधारणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले. तंत्रज्ञान कितीही प्रगत झाले तरी शिक्षकांची भूमिका अनन्यसाधारण असून त्यांनी ‘भविष्याचे शिल्पकार’ व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

१५ शिक्षकांचा गौरव व मागण्यांवर आश्वासन

या कार्यक्रमात शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या १५ गुणवंत शिक्षकांना जिल्हा शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.शिक्षकांच्या थकलेल्या आगाऊ वेतनवाढीचा विषय शासनस्तरावर मांडून तो सोडवण्याचे ठोस आश्वासनही गुलाबराव पाटील यांनी यावेळी दिले.

ताज्या बातम्या