
नाशिक | प्रतिनिधी | Nashik
अवघ्या आठ दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवासाठी (Ganeshotsav) शहरातील गणेश मंडळांना (Ganesh Mandal) नाशिक पोलिस आयुक्तालयाकडून अटी आणि शर्तींच्या अधीन राहून परवानग्या देण्यास सुरुवात झाली आहे. शहरात सध्या सुरू असलेल्या रस्ते दुरुस्ती व खोदकामाच्या पार्श्वभूमीवर, उत्सव काळात वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून मंडळांनी कडक स्वयंशिस्त पाळावी, असे स्पष्ट निर्देश पोलिसांनी दिले आहेत.
मुख्य शहरासह उपनगरांमध्ये अनेक मंडळांचे मंडप रस्त्यालगत असल्याने भाविकांच्या (Devotees) वाहनांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्तालयाच्या वाहतूक शाखेने विशेष नियोजन केले असून, सातही वाहतूक पथकांना सतर्कतेचे निर्देश दिले आहेत. उत्सव काळात कायदा व सुव्यवस्था तसेच रहदारी सुरळीत ठेवण्यासाठी महापालिका व पोलिसांकडून मंडळांकडून विशेष हमीपत्र लिहून घेतले जात आहे.
या हमीपत्रावर मंडळाच्या अध्यक्षाची स्वाक्षरी अनिवार्य करण्यात आली आहे. पारंपरिक वाद्यांच्या निनादात गणरायाचे (Ganpati) आगमन होणार असल्याने, नागरिकांनी व मंडळांच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना सहकार्य करून स्वयंशिस्त पाळावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
स्वयंसेवक आणि पोलिसांची नजर
वाहतूक कोंडी झाल्यास संबंधित मंडळ जबाबदार धरले जाणार असून, अटी-शर्तींचे उल्लंघन झाल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांसोबतच ट्रॅफिक वॉर्डन आणि होमगार्ड्सची नियुक्ती करण्यात येणार आहे. तसेच गर्दीच्या ठिकाणी ऐनवेळी वाहतूक वळवण्याचा निर्णय घेतला जाईल.
हमीपत्रातील प्रमुख अटी
- वाहतुकीस अडथळा नाही: मंडपामुळे रस्त्यावरील रहदारीला कोणताही अडथळा निर्माण होणार नाही.
- गर्दी नियंत्रण व सुरक्षा: मंडपात चेंगराचेंगरी होऊ नये म्हणून दोन्ही बाजूंनी दोरखंड किंवा सुरक्षित व्यवस्था उभारणे बंधनकारक.
- स्वतंत्र पार्किंग: भाविकांच्या वाहनांसाठी मंडळांना स्वतंत्र पार्किंग जागेचे नियोजन करावे लागेल.
- ध्वनिप्रदूषणावर नियंत्रण: कोणत्याही मंडळात ‘डीजे’ वापरण्यास बंदी असून, साऊंड सिस्टिमसाठी निश्चित डेसिबल मर्यादेचे पालन करावे लागेल.
मुद्दे
- गतवर्षीच्या नोंदीनुसार मंडळांची आकडेवारी
- मौल्यवान मंडळे: ३१
- परिमंडळ १ मधील मंडळे: ४४२
- परिमंडळ २ मधील मंडळे: ४२५




