Sunday, September 6, 2026
Homeक्राईमNashik Crime News : चिमुकल्यांसमोरच आवळला पत्नीचा गळा; पतीसह दीरावर गुन्हा

Nashik Crime News : चिमुकल्यांसमोरच आवळला पत्नीचा गळा; पतीसह दीरावर गुन्हा

सह्याद्री हॉस्पिटलमागील गार्डनमधील धक्कादायक घटना

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

- Advertisement -

संशयित पतीचा दुसरा विवाह आणि पूर्वीच्या पोलीस तक्रारीचा राग मनात धरून दोन लहान मुलांदेखतच पत्नीचा (Wife) गळा आवळून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. सह्याद्री हॉस्पिटलमागील उद्यानात घडलेल्या या हल्ल्याप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात (Mumbai Naka Police Station) पती आणि दिराविरुद्ध खुनाच्या प्रयत्नासह गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अशोका मार्ग परिसरातील खोडेनगर येथे राहणाऱ्या ३६ वर्षीय पीडित महिलेचा जानेवारी २०२५ मध्ये प्रेमविवाह झाला होता. मात्र, लग्नानंतर पतीने दुसरीशी घरोबा केल्याचे समजताच उभयतांमध्ये वाद सुरू झाले. यापूर्वीही पतीने जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याने त्याच्यावर मुंबई नाका पोलिसांत गुन्हा दाखल आहे. या प्रकरणात तो नुकताच जामिनावर (Bail) सुटून बाहेर आला होता. तीन सप्टेंबर रोजी रात्री पीडिता दोन लहान मुलांना घेऊन उद्यानात गेली असताना, पखाल रोड येथे राहणारा संशयित पती आणि दिर दुचाकीवरून तेथे आले.

पोलीस ठाण्यात (Police Station) तक्रार का केलीस?, असा जाब विचारत पतीने मुलांसमोरच पत्नीचा गळा आवळून आज तुला इथेच संपवतोच, अशी धमकी दिली. त्यानंतर दोघांनी मिळून तिला बेदम मारहाण केल्याने ती जमिनीवर कोसळली. एका प्रत्यक्षदर्शी महिलेने मध्यस्थी करत तिला वाचवण्याचा प्रयत्न केला असता, संशयित पतीने पुन्हा नांदण्यासाठी अमानुष व विकृत मागणी करत तिला धमकावले.

उपचारानंतर गुन्हा दाखल

हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या महिलेवर जिल्हा शासकीय रुग्णालयात (सिव्हिल हॉस्पिटल) उपचार करण्यात आले. यानंतर पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून मुंबई नाका पोलिसांनी पती आणि दिराविरुद्ध खुनाचा प्रयत्न मारहाण व धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत. जामिनावर बाहेर आलेल्या संशयिताच्या या कृत्यामुळे परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.

ताज्या बातम्या