रात्री 8.30 वाजता तुफान दगडफेक : जाळपोळ
कोरोनाचा सामना करण्यासाठी देशभरात एकीकडे सर्वत्र ‘जनता कर्फ्यू’ लागू असताना रावेरात मात्र रात्री 8.30 वाजेच्या सुमारास तुफान दगडफेक करण्यात आली. 144 कलम लागू असतांनाही झालेली ही दगडफेक व जाळपोळ आत्मपरीक्षण करायला लावणारी असून रावेरमधील वातावरण तणावपूर्ण होते.
दरम्यान, जळगावपासून मुक्ताईनगरपर्यंतच्या पोलिसांना रावेरकडे पाचारण करावे लागले. त्याचसोबत प्रांताधिकारी, तहसीलदार रात्री उशिरापर्यंत घटनास्थळावर थांबून होते. क्षुल्लक कारणावरून झालेल्या या दंगलीत मोठ्या प्रमाणात मालमत्तेचे नुकसान झाले आहे. दरम्यान, या दगडफेकीत काही जण जखमी झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
कोरोनाला धक्का देण्यासाठी देशभरात लागू करण्यात आलेल्या ‘जनता कर्फ्यू’त जळगाव जिल्हादेखील सहभागी होता. रावेर शहरातदेखील याची सायंकाळपर्यंत नागरिकांनी अंमलबजावणी केली. मात्र रात्री 8.30 वाजता अचानक मुख्य चौकात तुफान दगडफेक करण्यात आली.
रावेर शहरातील दंगलीची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी यावल, मुक्ताईनगर, निंभोरा, अडावद, भुसावळ तसेच जळगाव येथील राखीव पोलिसांना रावेरकडे पाचारण करण्यास सांगितले व ते स्वत:देखील त्यांनी वरिष्ठ अधिकार्यांसह रावेर गाठले.




