Friday, May 3, 2024
HomeUncategorizedजळगाव : दुसरा रुग्ण करोनामुक्त

जळगाव : दुसरा रुग्ण करोनामुक्त

जळगाव  – 

येथील कोविड रुग्णालयात कोरोनाचा दुसरा रुग्ण बरा झाल्यामुळे त्यास बुधवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास घरी सोडण्यात आले आहे. अमळनेर तालुक्यातील मुंगसे येथील ६० वर्षीय महिला कोरोनामुक्त झाली आहे. या गंभीर आजारातून मुक्त झाल्याने आता पुनर्जन्म झाल्यासारखे वाटते. डॉक्टरांच्या यशस्वी प्रयत्नांमुळे कोरोनामुक्त होऊन आता घरी जाता येत आहे, अशा भावना या बर्‍या झालेल्या महिलेने व्यक्त केल्या.

- Advertisement -

मुंगसे येथील या महिलेस दोन मुलं असून ते मुंबईत कामानिमित्त राहतात. ही महिला मुंबईतील या मुलांकडे गेली होती. काही दिवसांपूर्वी ती मुंबईतून मुंगसे येथे परतली होती. त्यानंतर सर्दी, खोकला, ताप, श्‍वसन विकार आदी त्रास या महिलेस झाला. कोरोना संशयित म्हणून १७ मे रोजी दाखल केले असता या महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर १४ दिवसांनी फेरतपासणीतील पहिला आणि त्यानंतर फेरतपासणीतील दुसराही अहवाल निगेटिव्ह आला. त्यामुळे आरोग्य तपासणी करुन या महिलेस रुग्णालयाच्या वाहनातून घरी सोडण्यात आले. या महिलेने बरे होण्याचे श्रेय सर्व डॉक्टर आणि सहानुभूतीने योग्य औषधोपचार करणार्‍या कर्मचार्‍यांना दिले आहे.

या वेळी महिलेस गहिवरुन आले. तिने अहिराणीतून संवाद साधत अश्रूंना वाटही मोकळी करुन दिली. कोरोना झाल्याचे कळताच आता सर्व संपले. आता मरायचेच आहे, असे वाटले होते. परंतु, प्रभावी उपचार झाला. कर्मचार्‍यांनी आत्मबळ वाढवले. त्यामुळे बरे होण्यास मदत झाली.

रुग्ण बरा होण्यात यश मिळाल्यामुळे सर्व डॉक्टर, कर्मचार्‍यांनी या महिलेस टाळ्या वाजूवन निरोप दिला. या अगोदर मेहरुणमधील पहिला रुग्ण आणि आता दुसरा रुग्ण बरा करण्यात यश मिळाल्यामुळे डॉक्टर व कर्मचार्‍यांमध्ये आत्मविश्‍वास वाढल्याचे दिसत होते.

सात रुग्ण होताय बरे
या रुग्णालयातील इतर सात रुग्ण देखील बरे होत आहेत. त्यांचीही योग्य देखभाल, उपचार करुन ते बरे होतील. त्यांना सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर  लवकरच घरी सोडण्यात येईल, असे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.भास्कर खैरे यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या