अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
जिल्ह्यातील मागील वर्षी एकूण 343 गावांना टंचाई कालावधीत टँकरने पिण्याचे पाणी पुरवठा सुरु होता. जिल्हा परिषद अंतर्गत जलजीवन मिशन योजनेच्या आराखड्यात 108 गावे व 235 महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडील गावांना टँकरने पाणीपुरवठा सुरू होता. या 108 गावांपैकी आजमीतीस सुमारे 59 गावांना टँकरमुक्त करण्यात जिल्हा परिषदेला यश आले आहे, तसेच मार्चअखेरपर्यंत यात अजून 21 गावांचे टँकर मुक्त करण्याचे जिल्हा परिषद प्रशासनाचे नियोजन आहे. यावर्षी एकूण 108 पैकी 80 गावांचे टँकरमुक्त करण्याचे जिल्हा परिषद प्रशासनाचे नियोजन आहे.
केंद्र शासनाच्या माध्यमातून सुरू असलेल्या जलजीवन मिशन योजने अंतर्गत नगर जिल्हा परिषद अंतर्गत नळ पाणीपुरवठा योजनेचे काम करण्यात येत असल्याने सततच्या पिण्याच्या पाण्याची टंचाई भासणार्या गावांना शुध्द पाणीपुरवठा उपलब्ध झाला आहे. दरवर्षी साधारणपणे डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायतींकडून टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी सुरू होते. तथापि यावर्षी जलजीवन मिशनच्या माध्यमातून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्या अथक प्रयत्नातून जिल्ह्यातील कायम पिण्याचे पाण्याची टंचाई भासणार्या 59 गावांच्या योजनेच्या कामातील काही उपांगाची कामे अद्याप प्रलंबीत असली तरी, योजनेतून पाणी पुरवठा सुरू करण्यात आल्याने टँकरची मागणी आणि टँकरमागे फिरायची वणवण थांबवण्यात प्रशासनाला यश आले आहे.
सतत टँकरग्रस्त असणार्या या गावांना यावर्षी टँकर लागणार नाही हे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी येरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे जलजीवन मिशन अंतर्गत झालेल्या कामांचे मोठे यश आहे. त्यामुळे शासनाचा टँकरवर होणार्या खर्चात मोठ्या प्रमाणात बचत झाली आहे. यामध्ये अकोले 1, कर्जत 25, जामखेड 12, नगर 2, नेवासा 1, पाथर्डी 5. पारनेर 7, श्रीगोंदा 1, संगमनेर 4, कोपरगाव 1 गावाचा समावेश आहे.
शाश्वत स्त्रोत बळकटीकरणासाठी आराखडा तयार
पाणी पुरवठा याजनेच्या शाश्वतेसाठी स्त्रोतांचे बळकटीकरण करणे अत्यंत महत्वाचे असल्याने 830 गावातील 16 हजार 72 (अस्तित्वातील स्त्रोत व जलजीवन मिशन योजनेचे स्त्रोत) स्त्रोतांच्या बळकटीकरणासाठी 15 हजार 348 उपाययोजनांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. यामध्ये पुर्नभरण चर, सिमेंट बंधारे, कोअर गॅबीयन बंधारे, पाझर तलाव व साठवण तलाव दूरुस्ती, पाऊस पाणी संकलन, मेटॅलीक टैंक, अपारंपारीक उपाययोजना, विहिर खोलीकरण व आडवे बोअर इत्यादी उपाययोजना प्रस्तावीत करण्यात आल्या आहेत.