Tuesday, May 5, 2026
HomeनगरJamkhed News : जामखेड शहरात कॅफे हाऊसच्या नावाखाली अश्लील धंद्यांचा सुळसुळाट; पोलिसांच्या...

Jamkhed News : जामखेड शहरात कॅफे हाऊसच्या नावाखाली अश्लील धंद्यांचा सुळसुळाट; पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

जामखेड । तालुका प्रतिनिधी

शहरात सध्या कॅफे हाऊसच्या नावाखाली अश्लील चाळे आणि अनैतिक कृत्ये सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. शैक्षणिक संस्थांच्या परिसरात आणि मुख्य रस्त्यांवर छुप्या पद्धतीने चालणाऱ्या या गोरखधंद्यामुळे सुजाण नागरिक आणि पालकांमध्ये संतापाची लाट उसळली असून, या प्रकारांना कोणाचा छुपा पाठिंबा आहे, अशी चर्चा आता शहरात रंगू लागली आहे.

- Advertisement -

शहराच्या कानाकोपऱ्यात सध्या कॅफे संस्कृती वेगाने पसरली आहे. मात्र, यातील अनेक ठिकाणी पिण्यासाठी साधे स्वच्छ पाणीही उपलब्ध नसते, तिथे तासाला १ हजार रुपये दराने ‘प्रायव्हसी’च्या नावाखाली स्वतंत्र केबिन उपलब्ध करून दिल्या जात आहेत. महाविद्यालयीन युवक-युवती आणि शालेय विद्यार्थी शिक्षणाचे नाव सांगून अशा ठिकाणी तासन् तास बसत असल्याचे दिसून येत आहे. या प्रकारामुळे शहराची सांस्कृतिक वीण बिघडत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

या कॅफे चालकांनी आपले अवैध धंदे लपवण्यासाठी विशेष खबरदारी घेतली असल्याचे उघड झाले आहे. कॅफेच्या दर्शनी भागात आकर्षक सजावट आणि बॅनर्स लावले जातात, तर आतील भागात अश्लील प्रकारांचा आवाज बाहेर जाऊ नये यासाठी मोठा आवाज करून टेप रेकॉर्डर लावले जातात. धक्कादायक म्हणजे, कॅफेच्या बाहेर पाळत ठेवण्यासाठी काही संशयास्पद व्यक्तींना तैनात केले जाते आणि छुप्या मार्गाने मुलींना बाहेर काढण्याची सोयही या ठिकाणी करण्यात आली आहे. भरवस्तीत सुरू असलेल्या या प्रकारांकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

केवळ कॅफेच नव्हे, तर शाळा, महाविद्यालये आणि खासगी शिकवणी वर्गांच्या परिसरातही रोडरोमिओंचा वावर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. अल्पवयीन मुलींचा पाठलाग करणे, त्यांना धमकावणे आणि ब्लॅकमेल करण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. यामुळे विद्यार्थिनींमध्ये भीतीचे वातावरण असून पालकांना आपल्या मुलींना शिक्षणासाठी घराबाहेर पाठवताना चिंता सतावू लागली आहे. मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न आता ऐरणीवर आला असून, पोलिसांनी साध्या वेशात गस्त घालून अशा विकृत प्रवृत्तींचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिक करत आहेत.

प्रशासनाकडून होत असलेल्या दुर्लक्षावर नागरिकांनी तीव्र आक्षेप नोंदवला असून अशा अवैध केबिन संस्कृतीवर तातडीने बुलडोझर फिरवण्याची गरज व्यक्त केली आहे. जर या कॅफेवर वेळीच कारवाई झाली नाही, तर तरुणाई चुकीच्या मार्गाला लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. शहरातील विविध भागांत ‘प्रायव्हसी’च्या नावाखाली उभारलेले हे लाकडी केबिन्स अनैतिक कृत्यांचे अड्डे बनले असून त्यावर कडक नियमावली लागू करण्याची मागणी होत आहे.

या संदर्भात जामखेडचे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांनी कडक कारवाईचे संकेत दिले आहेत. त्यांनी स्पष्ट केले की, “जामखेड शहर आणि परिसरात जर कोणी अशा प्रकारचे कॅफे चालवून अल्पवयीन मुले-मुलींना असभ्य वर्तनासाठी जागा उपलब्ध करून देत असेल, तर त्याबाबत तातडीने पोलिसांना माहिती द्यावी. माहिती देणाऱ्याचे नाव पूर्णपणे गुप्त ठेवण्यात येईल.” आता पोलीस प्रशासन या तक्रारींनंतर प्रत्यक्ष मैदानात उतरून किती प्रभावी कारवाई करते, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

ताज्या बातम्या

पाणीपुरवठा

Nashik News: उन्हाच्या तीव्रतेचा परिणाम, धरणसाठा ‘इतक्या’ टक्क्यांवर; जिल्ह्यात ‘इतक्या’ टँकरद्वारे...

0
नाशिक | प्रतिनिधीनाशिक जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणावर वाढली असून त्याचा थेट परिणाम धरणांतील पाणीसाठ्यावर होताना दिसत आहे. तापमानाने ४० सेल्सिअसचा...