जामखेड |प्रतिनिधी| Jamkhed
शहरातील नगररोडवरील शासकीय विश्रामगृहासमोरील आनंद कुशन दुकानाला रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत संपूर्ण दुकान जळून खाक झाले असून, शेजारील काही टपर्या व दुकानांनाही आगीची झळ बसली. अग्निशामक दल, पाण्याचे टँकर आणि स्थानिक नागरिकांच्या सुमारे साडेतीन तासांच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आली. दुकानात पडदे, कुशन आणि गाद्यांसारखे ज्वलनशील साहित्य असल्याने आग झपाट्याने पसरली. आगीचे मोठे लोळ आणि धुराचे लोट दिसू लागल्याने परिसरात घबराट निर्माण झाली.
नागरिकांनी सुरुवातीला आग विझवण्याचा प्रयत्न केला; मात्र आग वाढल्याने जामखेड नगरपरिषदेचा अग्निशामक बंब घटनास्थळी दाखल झाला. आगीची तीव्रता लक्षात घेऊन पाण्याचे टँकर बोलावण्यात आले, तसेच आष्टी नगरपंचायतीचा अग्निशामक बंबही मदतीसाठी मागविण्यात आला. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशामक दलाचे जवान आणि नागरिकांनी शर्थीचे प्रयत्न केले. खबरदारी म्हणून परिसरातील वीजपुरवठा काही काळ बंद करण्यात आला. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. आगीचे नेमके कारण आणि आर्थिक नुकसानीचा तपशील अधिकृतरीत्या स्पष्ट झालेला नाही.




