Sunday, September 13, 2026
Homeदेश विदेशजम्मू काश्मीरमध्ये मेहबूबा मुफ्तींसह अनेक मोठे नेत नजरकैदेत; कारण काय?

जम्मू काश्मीरमध्ये मेहबूबा मुफ्तींसह अनेक मोठे नेत नजरकैदेत; कारण काय?

जम्मू-काश्मीर । Jammu-Kashmir

जम्मू-काश्मीरमध्ये सध्याच्या आरक्षण धोरणावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या धोरणाविरोधात विद्यार्थ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या अनेक दिग्गज नेत्यांना प्रशासनाने त्यांच्या राहत्या घरी नजरकैदेत ठेवले आहे. यामध्ये पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीच्या (PDP) अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती आणि नॅशनल कॉन्फरन्सचे (NC) खासदार आगा सय्यद रुहुल्लाह मेहदी यांच्यासह अनेक प्रमुख नावांचा समावेश आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी श्रीनगरमधील गुपकर रोडवर विद्यार्थ्यांनी शांततापूर्ण मार्गाने निदर्शने करण्याचे नियोजन केले होते. या आंदोलनात सहभागी होण्याची घोषणा नेत्यांनी केल्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचे कारण देत प्रशासनाने ही कठोर पावले उचलली आहेत. नजरकैदेत असलेल्या नेत्यांमध्ये मेहबूबा मुफ्ती, त्यांची कन्या इल्तिजा मुफ्ती, श्रीनगरचे खासदार रुहुल्लाह मेहदी, पीडीपी नेते वाहीद पर्रा आणि श्रीनगरचे माजी महापौर जुनैद मट्टू यांचा समावेश आहे.

नजरकैदेची माहिती मिळताच नेत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केंद्र आणि स्थानिक प्रशासनावर टीका केली आहे. खासदार रुहुल्लाह मेहदी यांनी त्यांच्या निवासस्थानाबाहेर तैनात असलेल्या सशस्त्र पोलिसांचे फोटो शेअर करत प्रश्न उपस्थित केला आहे की, “विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ होणारी शांततापूर्ण निदर्शने दडपण्यासाठी ही पूर्वनियोजित कारवाई आहे का?” दुसरीकडे, पीडीपी नेते वाहीद पर्रा यांनी या घटनेचा निषेध करताना म्हटले की, लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यापासून रोखणे हे अत्यंत दुर्दैवी आहे. सरकार विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करून त्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.


जम्मू-काश्मीरमधील सध्याच्या आरक्षण धोरणामुळे ‘ओपन मेरिट’ (Open Merit) प्रवर्गातील विद्यार्थ्यांमध्ये मोठा असंतोष आहे. विद्यार्थ्यांच्या मते, सध्याच्या आरक्षण प्रणालीमुळे गुणवंत विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे. एक वर्षापूर्वी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी या समस्येवर तोडगा काढण्यासाठी एका विशेष समितीची स्थापना केली होती. मात्र, समिती स्थापन होऊन बराच काळ लोटला तरी अद्याप कोणताही ठोस निर्णय किंवा अहवाल जाहीर झालेला नाही.

समितीचा अहवाल येण्यास होणारा विलंब आणि आरक्षण कोट्यातील त्रुटींमुळे विद्यार्थी हवालदिल झाले आहेत. प्रशासनाकडून आश्वासने मिळूनही कृती होत नसल्याने विद्यार्थ्यांनी आज गुपकर रोडवर ठिय्या आंदोलन करण्याचे ठरवले होते. या आंदोलनाला राजकीय नेत्यांनी पाठिंबा दर्शवल्यामुळे प्रशासनाने श्रीनगरमध्ये सुरक्षा व्यवस्था कडक केली असून प्रमुख नेत्यांच्या हालचालींवर निर्बंध आणले आहेत. या कारवाईमुळे खोऱ्यातील राजकीय वातावरण अधिकच चिघळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सरकार आता विद्यार्थ्यांच्या या मागणीवर काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ताज्या बातम्या

default-featured-image

Nashik Accident News : प्रशासनाचा निष्काळजीपणा! पाण्याच्या पाईपवर आदळून तरुणाचा मृत्यू,...

0
नवीन नाशिक | प्रतिनिधी | New Nashik रस्त्यावर सुरक्षेचे कोणतेही नियम न पाळता सुरू असलेल्या कामामुळे एका तरुण पित्याचा बळी गेल्याची दुर्देवी घटना शहरातील कृषी...