Tuesday, May 5, 2026
HomeनगरAccident News : भीषण अपघात! ट्रकने साडेचार वर्षांच्या बालकाला चिरडले; एकुलत्या एक...

Accident News : भीषण अपघात! ट्रकने साडेचार वर्षांच्या बालकाला चिरडले; एकुलत्या एक मुलाचा जागीच मृत्यू

रांजणगाव देशमुख । वार्ताहर

कोपरगाव-संगमनेर मार्गावरील जवळके चौफुली येथे आज एक अत्यंत भीषण आणि काळजाचा थरकाप उडवणारा अपघात घडला. वेगाने जाणाऱ्या एका कांद्याच्या ट्रकने साडेचार वर्षांच्या चिमुरड्याला चिरडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण जवळके परिसरात शोककळा पसरली असून संतप्त ग्रामस्थांनी प्रशासनाच्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, आंश विनोद जयस्वाल (वय ४.५ वर्षे) असे अपघातात मृत्यू झालेल्या बालकाचे नाव आहे. जयस्वाल कुटुंब हे मूळचे मध्य प्रदेशातील रहिवासी असून, गेल्या दहा वर्षांपासून ते जवळके परिसरात सुतारकाम करून आपली उपजीविका चालवत आहेत. आंश हा या दांपत्याचा एकुलता एक मुलगा होता. एका क्षणात घरातील हसते-खेळते बाळ हिरावले गेल्याने जयस्वाल कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

अपघाताची ही घटना शुक्रवारी दुपारी घडली. संगमनेरकडून कोपरगावच्या दिशेने कांद्याने भरलेला एक ट्रक (क्रमांक RJ 14 GR 4035) वेगाने जात होता. जवळके चौफुली परिसरात हा ट्रक आला असता, चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रकने चिमुरड्या आंशला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, ट्रकचे चाक अंगावरून गेल्याने आंशचा जागीच अंत झाला. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आणि स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली.

घटनेची माहिती मिळताच जवळकेचे पोलीस पाटील सुधीर थोरात यांनी तातडीने शिर्डी पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या बालकाचा मृतदेह ताब्यात घेतला आणि उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठवला. याप्रकरणी पोलिसांनी संबंधित ट्रक चालकाला ताब्यात घेतले असून, त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ट्रकदेखील पोलिसांनी जप्त केला आहे.

जवळके चौफुली हा मार्ग नगर-मनमाड महामार्गाला जोडणारा अत्यंत वर्दळीचा रस्ता मानला जातो. या ठिकाणी अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणात ये-जा असते, मात्र वाहनांच्या वेगावर कोणतेही नियंत्रण नसल्याचे चित्र आहे. या परिसरात शाळा आणि वस्त्या असल्याने नागरिकांची नेहमीच वर्दळ असते. तरीही येथे प्रशासनाकडून सुरक्षेच्या पुरेशा उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

वारंवार होणारे अपघात आणि निष्पाप जीवांचा जाणारा बळी लक्षात घेता, प्रशासनाने या ठिकाणी तत्काळ स्पीड ब्रेकर (गतिरोधक), वेगमर्यादा दर्शवणारे फलक आणि इतर सुरक्षा उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरू लागली आहे. जर प्रशासनाने या मागणीकडे दुर्लक्ष केले, तर येत्या काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा स्थानिक ग्रामस्थांनी दिला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास शिर्डी पोलीस करत आहेत.

ताज्या बातम्या

माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे ओझर विमानतळावर आगमन व स्वागत

0
नाशिक | जिमाका वृत्तसेवा Nashik देशाचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे आज रात्री सव्वानऊच्या सुमारास ओझर विमानतळावर सपत्नीक आगमन झाले. विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम...