राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata
सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर पावसाचे मध्यम स्वरूपाचे आगमन होत आहे. धरणातील विसर्ग नवीन पाण्याची आवक कमी झाल्याने घटविण्यात आले आहेत. गोदावरीत काल सायंकाळी 6 वाजता 46227 क्युसेकने विसर्ग सुरूच असल्याने गोदावरी अद्यापही दुथडी भरून वाहत आहे. खाली जायकवाडी जलाशयात उपयुक्त साठा काल सायंकाळी 6 वाजता 58.52 टक्के इतका झाला होता. 65 टक्के होण्यासाठी 5.5 टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे. दीड दिवसात वरील धरणातील आवक पाहता तेही पूर्ण होईल असा अंदाज आहे.
नगर, नाशिक जिल्ह्यातील शेतकर्यांच्या नजरा जायकवाडीकडे खिळल्या आहेत. जायकवाडीत काल सायंकाळी 6 वाजता उपयुक्त साठा 44.5 टीएमसी पर्यंत पोहचला होता. 50 टीएमसी झाले की 65 टक्के उपयुक्त साठा होईल. तसे झाल्यानंतर समन्यायी पाणी वाटप कायद्यानुसार नगर, नाशिक जिल्ह्यातील धरणांमधून जायकवाडीला पाणी सोडण्याची गरज राहणार नाही. काल सायंकाळी 6 वाजता जायकवाडी जलाशयात 56290 क्युसेकने पाणी दाखल होत होते. या धरणाचा उपयुक्त साठा 58.52 टक्क्यांवर पोहचला आहे. उपयुक्त साठा 44.5 टीएमसी तर मृतसह एकूण साठा 70.6 टीएमसी इतका झाला आहे. या धरणाची एकूण पाणी संचय पातळी 102 टीएमसी इतकी आहे. प्रवरेतूनही जायकवाडीत विसर्ग दाखल होत होता.
दरम्यान, काल दिवसभरात नाशिक जिल्ह्यात मध्यम स्वरूपाच्या पावसाचे आगमन होत होते. काही ठिकाणी हलक्या सरींचे आगमन होत होते. आज-उद्या घाटमाथ्यावर पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. तो खरा ठरल्यास गोदावरीचे पाणी वाढण्याची शक्यता आहे. दारणा धरणाच्या भिंतीजवळ 4 मिमी पावसाची नोंद झाली. भामला 19 मिमी, भावलीला 34 मिमी पावसाची नोंद झाली. घोटी, इगतपुरीला पावसाचे प्रमाण अधिक आहे. काल सकाळी संपलेल्या 24 तासांत इगतपुरी येथे 143 मिमी, घोटी येथे 113 मिमी पावसाची नोंद झाली.
दारणा धरणाच्या भिंतीजवळ 31 मिमी पावसाची नोंद झाली. 24 तासात. 941 दलघफू नवीन पाण्याची आवक झाली. 13250 क्युसेकने विसर्ग सुरू होता. तो काल सायंकाळी 6 वाजता 5330 क्युसेकवर आणण्यात आला. भावलीतून 822 क्युसेकने, भाममधून 2511 क्युसेक, वालदेवीतून 1050 क्युसेक, आळंदीतून 1262 क्युसेक, कडवातून 2319 क्युसेक विसर्ग सुरू आहे. पालखेड मधून 1986 क्युसेक, पुणेगाव मधून 805 क्युसेक, ओझरखेड मधून 872 क्युसेकने विसर्ग सुरू आहे.
गंगापूर धरणाच्या पाणलोटातही काल दिवसभरात 12 तासांत 22, आंबोली 28, त्र्यंबक 19, कश्यपी 18, गौतमी 27 मिमी असा पाऊस नोंदला गेला. काल सकाळी संपलेल्या मागील 24 तासांत गंगापूरला 78, त्र्यंबक 48, आंबोली 72 मिमी पावसाची नोंद झाली. 24 तासांत गंगापूरमध्ये 391 दलघफू नवीन पाणी दाखल झाले. गंगापूरमधून 4947 क्युसेकने विसर्ग सुरू आहे. गौतमी गोदावरी मधून 500 क्युसेक ने, कश्यपी मधून 1000 क्युसेक ने विसर्ग सुरू आहे.




