मुंबई | प्रतिनिधी Mumbai
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यात झालेली युती, काँग्रेसने स्वबळावर निवडणूक लढवण्याचा घेतलेला निर्णय यामुळे महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट काय भूमिका घेणार याबाबत उत्सुकता असताना शुक्रवारी जयंत पाटील यांनी ‘मातोश्री’ वर जाऊन भेट उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या दोघांमध्ये जवळपास दोन तास चर्चा झाली. मात्र या बैठकीनंतर जागा वाटपाबाबत कोणताही तोडगा निघू शकला नाही.
उद्धव ठाकरेंबरोबर चर्चा करण्यासाठीच मी आलो होतो. बरीच चर्चा झाली. पण अजून आम्ही निष्कर्षापर्यंत पोहोचलेलो नाही. आम्ही महाविकास आघाडीतील घटक पक्ष आहोत. त्यामुळे मुंबईत उद्धव ठाकरे यांच्याशी आघाडी व्हावी असा आमचा प्रयत्न असल्याचे जयंत पाटील यांनी या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले.
काँग्रेस, उद्धव ठाकरे यांनी मुंबईत एकत्र यावे, अशी आमची धारणा होती. परंतु ते दोन मोठे पक्ष आहेत. आमच्या पक्षाची मुंबईत त्या दोन पक्षांएवढी ताकद नाही. त्यामुळे आम्ही उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करत आहोत. बरीचशी चर्चा सकारात्मक झाली आहे. पण अजून निष्कर्षापर्यंत आलेलो नाही, असे पाटील म्हणाले. मुंबईत गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे नगरसेवक जिथून निवडून आले होते, त्या जागा आम्हाला सुटाव्यात असे पक्षाचे म्हणणे आहे. त्यासाठी उद्धव ठाकरेंशी चर्चा केल्याचेही त्यांनी सांगितले.
पुण्यात दोन राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येत आहेत. याकडे लक्ष वेधले असता जयंत पाटील म्हणाले, ३० तारखेला अर्ज भरण्याचा शेवटाचा दिवस आहे. त्याआधी मी महाराष्ट्रातील सगळ्या शहरात कोण-कोणाशी युती करत आहे याची माहिती घेतलेली नाही. त्यामुळे सर्व महाराष्ट्रात वेगवेगळ्या स्तरावर आमच्या पक्षाचे स्थानिक नेतृत्व चर्चा करत आहे. तसेच पक्षाचे बहुसंख्य कार्यकर्ते ज्या मताचे आहेत, त्या मताप्रमाणे आम्ही वेगवेगळ्या महापालिकांमध्ये आघाडी करत आहोत.




