Saturday, May 2, 2026
HomeनगरAhilyanagar : जेऊरमध्ये सौर प्रकल्पावरून संतापाचा उद्रेक

Ahilyanagar : जेऊरमध्ये सौर प्रकल्पावरून संतापाचा उद्रेक

जिल्हाधिकारी पंकज आशिया यांना निवेदन || काम तात्काळ थांबवण्याची मागणी

अहिल्यानगर |तालुका प्रतिनिधी| Ahilyanagar

नगर तालुक्यातील जेऊर येथील घुरुडी डोंगरावर सुरू असलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पाचे काम नियोजनाअभावी व मनमानी पद्धतीने सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. यासंदर्भात मंगळवारी (दि. 10) जिल्हाधिकारी पंकज आशिया यांना निवेदन देण्यात आले असून विविध गंभीर मुद्दे उपस्थित करण्यात आले आहेत. शासनाचे व शेतकरी हिताचे काम असल्याचे सांगत संबंधित कंपनीकडून दडपशाहीच्या माध्यमातून काम सुरू असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.

- Advertisement -

जेऊर येथील गट क्रमांक 117 मधील 31 एकर सरकारी जागेवर मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत सौर ऊर्जा प्रकल्प उभारणीचे काम सुरू आहे. या प्रकल्पामुळे शेतकर्‍यांना दिवसा वीज उपलब्ध होणार असल्याचे सांगितले जात असले, तरी कामाच्या अंमलबजावणीत अनेक त्रृटी असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. प्रकल्प सुरू करण्यापूर्वी जागेची अधिकृत हद्द निश्चित करण्याची अट घालण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात हद्द निश्चिती न करताच काम सुरू केल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. तसेच ग्रामपंचायतीला कोणतीही पूर्वकल्पना देण्यात आलेली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.

ज्या रस्त्यावर विद्युत पोल उभारले जात आहेत, त्या रस्त्याची अधिकृत मोजणी व हद्द निश्चिती झालेली नसताना काम सुरू असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. बहिरवाडी रस्त्यालगत मागील महिन्यात उभारलेले पोल स्थानिकांच्या विरोधानंतर व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पत्रामुळे काढून घेण्यात आले होते. सध्या जुन्या इमामपूर (खोल ओढा) रस्त्यालगत पोल उभारणीचे काम पोलीस बंदोबस्तात सुरू आहे. संबंधित रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण असून, मोजणी न करता पोल उभारणे धोकादायक ठरू शकते, असा इशारा ग्रामस्थांनी निवेदाद्वारे दिला आहे.

सौर प्रकल्पाचे काम तात्काळ थांबवून संबंधित कंपनीला देण्यात आलेल्या परवानग्या व अटींची चौकशी करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. अन्यथा ग्रामस्थांच्या रोषाचा उद्रेक होऊ शकतो, असा इशाराही देण्यात आला आहे. निवेदनावर अजय पवार, दिनेश पाटोळे, रवींद्र पवार, पांडुरंग पवार, महेश ससे, बबन शिंदे, अशोक पवार, सोनाली पवार, मयूर पवार, अमोल तोडमल, वैशाली तोडमल, सुमन तोडमल, नंदकुमार तोडमल, अश्विनी ससे, दिनेश ससे, निर्मला ससे, सौरभ शिंदे, संपत शिंदे, मीना शिंदे, शरद शिंदे, महेश दारकुंडे, सुमन दारकुंडे, सिद्धेश्वर दारकुंडे, अलका शिंदे, छाया पवार, सलीम शेख, सुरज ससे, मुस्ताक शेख, साकिब शेख, विजय वाघ आदी ग्रामस्थांच्या सह्या आहेत.

661 झाडांची तोड
प्रकल्प परिसरात लिंब, बाभूळ, हिवर, शिसम आदी प्रजातींची एकूण 661 झाडे तोडण्यात आल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. त्याऐवजी 1983 झाडे लावून त्यांचे संगोपन करण्याची अट कंपनीवर घालण्यात आली आहे. मात्र तोडलेली झाडे जागेवरच पडून कुजत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

ग्रामपंचायत अनभिज्ञ
जेऊर ग्रामपंचायतीला प्रकल्पाबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. स्थानिकांना विश्वासात न घेता काम सुरू असल्याने नाराजी वाढत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

पालकमंत्र्यांचे निर्देश
सदर रस्त्यावरील अतिक्रमण हटवून डांबरीकरणासाठी नागरिकांकडून पाठपुरावा सुरू आहे. या प्रकरणी पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी दखल घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागास अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. अशा परिस्थितीत पोल उभारणीमुळे शेतकरी, विद्यार्थी व नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असे निवेदनात म्हटले आहे.

ताज्या बातम्या

Womens T20 World Cup 2026 : टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय महिला...

0
मुंबई | Mumbai एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेवर मात करून ऐतिहासिक कामगिरी बजावल्यानंतर आता भारतीय महिला क्रिकेट संघाचे लक्ष टी-२० विश्वचषकावर (Womens T20 World Cup...