Friday, May 3, 2024
Homeनगरजेऊरच्या 'त्या' गाळ्यांचा झाला अखेर लिलाव

जेऊरच्या ‘त्या’ गाळ्यांचा झाला अखेर लिलाव

अहमदनगर | वार्ताहर | Ahmednagar

नगर तालुक्यातील जेऊर येथे नव्याने भव्य व्यापारी संकुल बांधण्यात आले आहे. अनेक वाद विवाद, न्यायालयीन प्रक्रियेनंतर अखेर शनिवार दि. २६ रोजी व्यापारी संकुलाच्या गाळ्यांचे लिलाव करण्यात आले.

- Advertisement -

याबाबत सविस्तर माहिती अशी कि, तालुक्यातील मोठे गाव असुन देखील गावात व्यापारी संकुल नव्हते. बाजारपेठ अतिक्रमणात वसलेली आहे. अतिक्रमण हटविण्याबाबत नाशिक विभागीय आयुक्तांनी आदेश दिलेला आहे. चौदाव्या वित्त आयोगातुन सुमारे ४९ लक्ष रुपये खर्चुन येथे १३ गाळ्यांच्या व्यापारी संकुलाचे काम पुर्णत्वाकडे आले आहे. त्यातील ७ गाळे जुन्या व ग्रामपंचायतचा कर नियमीत भरणा-या दुकानदारांसाठी राखीव ठेवण्यात आले होते. तर उर्वरीत सहा गाळ्यांचे लिलाव करण्यात आले.

गावच्या व्यापारी संकुलाचा प्रश्न अनेक वर्षापासुन रेंगाळत पडलेला होता. प्रत्येक ग्रामसभेत अतिक्रमण व व्यापारी संकुल या विषयावर चर्चा होत होती. परंतु ठोस कारवाई होत नव्हती. सद्यस्थितीत बांधलेल्या व्यापारी संकुलाच्या गाळ्यांबाबत सुरुवातीपासुनच आरोप प्रत्यारोप होत होते. नुतन गाळ्यांसाठी विशेष ग्रामसभेचेही आयोजन करण्यात आले होते. ग्रामसभेत वादळी चर्चा होवुन विवीध आरोप करण्यात आले होते. सदर गाळ्यांचा वाद न्यायालयात देखील गेला होता. न्यायालयीन प्रक्रिया पार पडल्यानंतर ग्रामपंचायतच्या वतीने गाळ्यांचे लिलाव करण्यात आले.

विद्यमान सरपंच व सदस्यांचा कार्यकाळ सोमवार दि.२८ रोजी संपत असल्यानेच गाळ्यांची लिलाव प्रक्रिया उरकवण्यात आल्याची काही ग्रामस्थांचे म्हणने आहे. तर गावाला सुसज्ज असे व्यापारी संकुल उभे राहिल्याने काहि ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.

यावेळी सरपंच मधुकर मगर, ग्रामसेविका सविता लांडे, अर्थ व बांधकाम समितीचे माजी सभापती बाजीराव गवारे, माजी सरपंच विकास कोथिंबीरे, सुनिल पवार, शामभाऊ विधाते, भास्कर मगर, नवनाथ तोडमल, स्वप्निल तवले, राजु तोडमल, अनिल तोडमल, राजु बोरकर, उपस्थित होते.

दुस-या टप्प्याचे काम मार्गी लावावे

सद्यस्थितीत व्यापारी संकुलाचा पहिला टप्पा पुर्णत्वास जात आहे. लिलाव प्रक्रिया व गाळ्याच्या अनामत रकमेतुन जवळपास ५० लक्ष रुपये ग्रामपंचायतकडे जमा होणार आहेत. या रकमेचा वापर करुन तात्काळ दुस-या टप्प्याचे काम मार्गी लावावे अशी मागणी ग्रामस्थांकडुन होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या