Wednesday, June 10, 2026
Homeक्राईमCrime News : दागिने उजळून देण्याच्या बहाण्याने पाच तोळे लंपास

Crime News : दागिने उजळून देण्याच्या बहाण्याने पाच तोळे लंपास

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

सोन्याचे दागिने पहिल्यापेक्षा जास्त उजळून देतो, असे म्हणून दोन अनोळखी इसमांनी एका 78 वर्षीय वृध्द महिलेकडील सुमारे पाच तोळ्याचे दागिने फसवणूक करून नेली. मंगळवारी (26 ऑगस्ट) दुपारी वीर सावरकर मार्ग, वसंत टेकडी, सावेडी येथे ही घटना घडली. या प्रकरणी सुमन मानिक बैरागी (वय 78) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, मंगळवारी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास त्या अंगणात कपडे वाळत घालत असताना दोन अनोळखी इसम घराच्या कंपाउंडमध्ये आले. त्यातील एकाने आम्ही भांड्याची पावडर विकायला आलो आहोत, याने भांडी चकाचक होतात असे सांगत त्यांचा विश्वास संपादन केला.

- Advertisement -

त्याने प्रथम घरातील तांब्याचे भांडे स्वच्छ करून दाखवले. त्यानंतर फिर्यादींच्या हातातील सोन्याच्या बांगडीवर पावडर घासून ती अधिक चमकदार झाली असल्याचे दाखवले. त्यावर विश्वास ठेवून फिर्यादीने आपले हातातील, गळ्यातील व कानातील सोन्याचे दागिने एका स्टीलच्या डब्यात ठेवून त्या इसमाकडे दिले. इसमाने त्यावर पावडर टाकून झाकण लावले व पाच मिनिटांनंतर उघडा, दागिने अधिक चमकतील असे सांगून डबा परत देत दोघेही पसार झाले.

तथापि, काही वेळाने डबा उघडून पाहिल्यावर त्यामध्ये कोणतेही दागिने आढळले नाहीत. त्यानंतर वृध्द दाम्पत्याने घरभर शोध घेतला पण दागिने मिळाले नाहीत. त्यावेळी त्यांना आपण फसवले गेल्याचे स्पष्ट झाले. चोरीस गेलेल्या दागिन्यांमध्ये तीन तोळ्याच्या सोन्याच्या दोन बांगड्या, चार ग्रॅमचे सोन्याचे कानातील दोन टॉप व दीड तोळ्याची सोन्याची चैन यांचा समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक योगेश चाहेर अधिक तपास करीत आहेत.

पोलिसांचे नागरिकांना आवाहन
या घटनेच्या पार्श्वभूमीवर तोफखाना पोलिसांनी नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे. अनोळखी व्यक्तींना घरात प्रवेश देऊ नये, कोणत्याही प्रकारच्या फसव्या डेमो किंवा प्रलोभनाला बळी पडू नये, तसेच अशा व्यक्ती दिसल्यास त्वरित पोलिसांना कळवावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

Shirdi : तुकाराम मुंढेंचा झंझावात आता शिर्डीत!

0
शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांनी राज्यभरात भेसळखोरांविरोधात धडक कारवाया सुरू केली असल्याने या झंझावाताचे लोण...