मुंबई | Mumbai
बदलापूर येथील दोन शाळकरी बालिकांवरील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा पोलीस चकमकीत मृत्यू झाला. मात्र, या चकमकीला पोलीसच जबाबदार असल्याचा निष्कर्ष मुंबई उच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वीच दिला. आता त्याही पुढे जाऊन राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मोठा गौप्यस्फोट केलाय.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख आणि परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळावा यासाठी मुंबईत सर्वपक्षीय जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले. या मोर्च्यानंतर बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी बदलापूर बलात्कार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेबाबत मोठा दावा केला. बलात्कार केलेल्यांना सोडवण्यासाठी अक्षय शिंदेंची हत्या झाली असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.
“अक्षय शिंदेला मारला. निर्घृणपणे हत्या झाली. शासकीय यंत्रणा पोलिसात हस्तक्षेप करते, तेव्हा पोलीसच बदनाम होतात. त्याच्या हाताला बेड्या होत्या. त्याला जवळून मारले. तो कसा रिव्हॉल्वर ओढणार? रिव्हॉल्वर त्याच्या हाताच ठसे नाही. अक्षय शिंदेबाबत बोलायला लोक तयार नाहीत. घाबरत आहेत. बलात्काराची केस आहे. समाज अंगावर येईल अशी लोकांना भीती वाटते. अरे अक्षय शिंदेने बलात्कारच केला नाही. बलात्कार केलेल्यांना सोडवण्यासाठी अक्षय शिंदेची हत्या झाली. अक्षय शिंदेला जिथे मारले तो मतदारसंघ माझा आहे. त्याला जिथे मारले तिथे एक चहा वाला बाजूला उभा होता. त्याने मला फोन करून सांगितले की इथे काहीतरी होणार आहे. त्यानंतर अक्षय शिंदेचा एन्काऊंटर झाल्याची माहिती समोर आली,” असे खळबळजनक विधान जितेंद्र आव्हाड यांनी केले.
“अक्षय शिंदेला गोळ्या घालणाऱ्या पोलिसांवर कारवाई करा असे कोर्टाने सांगितले आहे. अक्षय शिंदेच्या प्रकरणात अजून पर्यंत गुन्हा दाखल झालेला नाही. मुंबईचे पोलीस काय करू शकतात हे दाऊदला सर्वात जास्त माहिती आहे. म्हणूनच आज तो दुबईमध्ये बसला आहे. पोलीस खात्याची बदनामी गेल्या पाच वर्षात सत्ताधाऱ्यांनी केली. पोलीस यंत्रणेत हस्तक्षेप केल्यामुळे ते एकही काम करू शकत नाही,” असेही जितेंद्र आव्हाड म्हणाले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा