Wednesday, September 30, 2026
HomeनगरCrime News : नोकरी लावण्याचे आमिष दाखवून 12.75 लाखांची फसवणूक

Crime News : नोकरी लावण्याचे आमिष दाखवून 12.75 लाखांची फसवणूक

तरूणाच्या फिर्यादीवरून सहा जणांविरूध्द गुन्हा दाखल

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

आरोग्य विभाग, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि शाळा अशा विविध ठिकाणी नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून तरूणाची तब्बल 12 लाख 75 हजार रूपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात संबंधित व्यक्तींनी बनावट नियुक्ती आदेश देऊन दिशाभूल केल्याचा आरोप केला आहे.

- Advertisement -

याबाबत विठ्ठल रेवन्नाथ पाटेकर (वय 32, रा. बोल्हेगाव, शिवबा चौक, अहिल्यानगर) यांनी बुधवारी (10 जून) फिर्याद दिली आहे. मंगेश मार्शल भिंगारदिवे, उषा मंगेश भिंगारदिवे (दोघे रा. भिस्तबाग चौक), नितीन बाळासाहेब जाधव (रा. अहिल्यानगर), कालिदास बेळगे (रा. पाथर्डी), दिवाकर नादी (रा. पिंपळे गुरव, जि. पुणे), बाळासाहेब केदार (रा. तपोवन रस्ता, अहिल्यानगर) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीनुसार, पाटेकर यांची मंगेश भिंगारदिवे याच्याशी ओळख झाली. भिंगारदिवे याने सरकारी नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन देत आरोग्य विभागात लॅब टेक्निशियन पदावर नियुक्ती करून देण्याचे सांगितले. त्यासाठी विविध टप्प्यांमध्ये रोख व ऑनलाइन स्वरूपात मोठी रक्कम घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे.

फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, सुरूवातीला सुमारे सहा लाख रूपयांहून अधिक रक्कम स्वीकारल्यानंतरही आरोग्य विभागात नोकरी मिळाली नाही. त्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी लावून देण्याचे आश्वासन देत आणखी रक्कम घेण्यात आली. यावेळी नितीन जाधव, कालिदास बेळगे आणि दिवाकर नादी यांच्याशी ओळख करून देण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. मार्च 2024 मध्ये चार लाख रूपयांचा धनादेश देण्यात आला, तर मे 2024 मध्ये आणखी तीन लाख रूपये रोख स्वरूपात दिल्याचा दावा फिर्यादीने केला आहे. त्यानंतर जून 2024 रोजी स्टेट बँक ऑफ इंडियाचा कथित नियुक्ती आदेश देण्यात आला. मात्र नंतर हा आदेश बनावट असल्याचे लक्षात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

यानंतर संबंधितांनी एका शैक्षणिक संस्थेत नोकरी लावून देण्याचे आश्वासन दिले. त्यासाठी बाळासाहेब केदार यांच्याशी ओळख करून देण्यात आली. मात्र दीर्घकाळ उलटल्यानंतरही नोकरी न मिळाल्याने फिर्यादीने पैसे परत मागण्यास सुरूवात केली. एप्रिल 2025 मध्ये 50 हजार रुपये, जुलै 2025 मध्ये 95 हजार रुपये आणि ऑक्टोबर 2025 मध्ये 80 हजार रुपये परत करण्यात आले. उर्वरित रक्कम मागितल्यावर धमक्या देण्यात आल्या. तसेच पोलिसांत किंवा न्यायालयात जाण्याचे आव्हान देत जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे. फिर्यादीच्या दाव्यानुसार, विविध व्यवहारांमधून एकूण 12 लाख 75 हजार रुपये स्वीकारून नोकरीचे आमिष दाखवत फसवणूक करण्यात आली आहे.

ताज्या बातम्या

Gunratan Sadavarte : “ठाकरे बंधूंनी शपथ घेऊन सांगावे मोर्चा नक्की कशासाठी?”...

0
मुंबई | Mumbai देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार (Dnyanesh Kumar) यांच्या कार्यपद्धतीवर दोन सहआयुक्तांनी नाराजी व्यक्त केली होती, असे वृत्त 'द इंडियन एक्सप्रेस'ने...