अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
पत्रकारास मारहाण करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणार्या सराईत गुन्हेगारांच्या टोळीविरूध्द तोफखाना पोलिसांनी कठोर कारवाई केली आहे. या टोळीतील तीन संशयित आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याविरूध्द दाखल असलेल्या गुन्ह्यात भारतीय न्याय संहितेचे कलम 111 हे संघटीत गुन्हेगारीचे वाढीव कलम लावण्यात आले आहे.
या प्रकरणी सोनू उर्फ हेमंत दत्तात्रय कोहक (वय 27, रा. सनफॉर्मा शाळेसमोर, बोल्हेगाव), महेश उर्फ पप्पू दशरथ मते (वय 27, रा. पाईपलाईन रोड) आणि प्रशांत शिवाजी निक्रड (वय 28, रा. तागड वस्ती) या तिघांना अटक केली आहे. ते पोलीस कोठडीत आहे. यांच्यासह साथीदारांनी 20 ऑगस्ट रोजी पाईपलाईन रोड परिसरात पत्रकार सुशील थोरात व त्यांचा मुलगा सार्थक थोरात मारहाण केली होती.
सुशील थोरात यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात सोनू उर्फ हेमंत कोहक, विकी उर्फ विकास बाळासाहेब ढवण, महेश उर्फ पप्पू मते, प्रशांत निक्रड आणि अमोल रामदास साठे यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपींच्या पूर्वीच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची तपासणी केली असता, तोफखाना व पारनेर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत त्यांच्या विरोधात खुनाचा प्रयत्न, फसवणूक, जबरी मारहाण आदी गंभीर स्वरूपाचे 13 गुन्हे दाखल असल्याचे समोर आले.
दरम्यान, या आरोपींवर यापूर्वीही प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. मात्र, त्यांच्या वर्तनात सुधारणा न झाल्याने ते सातत्याने गंभीर स्वरूपाचे गुन्हे करीत असल्याचे पोलिसांच्या तपासात निदर्शनास आले. त्यामुळे या टोळीविरूध्द अधिक प्रभावी कारवाई करण्याच्या उद्देशाने तोफखाना पोलीस ठाण्याच्या वतीने अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्याकडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्यांनी प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.




