दिंडोरी | प्रतिनिधी Dindori
दिंडोरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गणोरवाडी शिवारात शेतवस्तीवरील घरात घुसून सशस्त्र दरोडा टाकणाऱ्या टोळीचा दिंडोरी पोलिसांनी अवघ्या २४ तासांत छडा लावला आहे. या प्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले असून अन्य दोन आरोपींचा शोध सुरू आहे. पोलिसांनी आरोपींकडून दोन बंदुका, जिवंत काडतुसे, चॉपर तसेच गुन्ह्यात चोरीस गेलेली मोटारसायकल हस्तगत केली आहे. नाशिक ग्रामीण पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.
दि. २ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री सुमारे १.४५ वाजेच्या सुमारास गणोरवाडी शिवारातील शेतगट क्रमांक ६४ येथे राहणारे संजय भास्कर पिंगळ यांच्या घरावर सहा सशस्त्र दरोडेखोरांनी हल्ला केला. त्यावेळी संजय पिंगळ व त्यांची पत्नी असे दोघेच घरी होते. आरोपींनी घरात प्रवेश करून दाम्पत्याला बंदुका, चाकू, तलवार व लोखंडी कोयत्याचा धाक दाखवून रोख रक्कम १ लाख ३० हजार रुपये, सोन्याचे दागिने, साडेतीनशे भार चांदीचे दागिने तसेच घरातील मोटारसायकल असा मुद्देमाल लुटून नेला होता.
या घटनेप्रकरणी दिंडोरी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ४८०/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता व आर्म्स ॲक्टच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणातून आरोपींचा शोध
या गंभीर गुन्ह्याचा तपास नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. स्वामी, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती विमला एम. तसेच कळवण विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आला.दिंडोरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मोरे यांनी तपासासाठी स्वतंत्र पथके तयार केली. गोपनीय बातमीदारांकडून माहिती मिळवून तसेच संशयित आरोपींचे मोबाईल क्रमांक व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींचा माग काढण्यात आला. पोलिसांच्या नियोजनबद्ध तपासामुळे चार आरोपींना अटक करण्यात यश आले.
अटक केलेल्या आरोपींमध्ये मनोहर रघुनाथ ब्राह्मणे (वय ३२, रा. गणोरवाडी, सध्या वलखेड, ता. दिंडोरी) तसेच गुड्डू ऊर्फ जयकिसन प्रेमपालसिंग (वय ३२), होरीलाल शामसुंदर हकीमसिंग (वय २८) आणि मुकेशकुमार रतनसिंग (वय २२, सर्व रा. उत्तर प्रदेश) यांचा समावेश आहे.
दोन बंदुका, जिवंत काडतुसे व चॉपर हस्तगत
अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेल्या दोन बंदुका, जिवंत काडतुसे, चॉपर तसेच चोरीस गेलेली मोटारसायकल हस्तगत करण्यात आली आहे. या गुन्ह्यातील अन्य दोन आरोपी अद्याप फरार असून त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत.
दिंडोरी व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कामगिरी
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक भगवान मथुरे व पोलीस निरीक्षक मोरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.या तपास पथकात पोलीस उपनिरीक्षक कैलास वाळके, पोलीस हवालदार विश्वनाथ काकड, प्रदीप शिंदे, बाळासाहेब पानसरे, पोलीस शिपाई दिलीप राऊत, रवि चव्हाण, प्रवीण भोईर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.तसेच स्थानिक गुन्हे शाखेकडील सहायक पोलीस उपनिरीक्षक दीपक निगळ, पोलीस हवालदार प्रितम लोखंडे, शिवाजी ठोंबरे, श्रीकांत गारूगे, एकनाथ हळदे, दीपक गुंजाळ, कैलास मानकर, हेमंत गिलबिले आणि प्रदीप बहिरम यांनीही गुन्हा उघडकीस आणण्यासाठी मोलाची मदत केली.
दरोड्यासारख्या गंभीर गुन्ह्याचा अल्पावधीत छडा लावत चार आरोपींना अटक केल्याने दिंडोरी पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे. उर्वरित दोन आरोपींचा शोध आणि पुढील तपास दिंडोरी पोलीस करीत आहेत.




