Tuesday, April 28, 2026
HomeनगरAkole : कळसच्या तरूण शेतकर्‍याचा उष्माघातामुळे दुर्दैवी मृत्यू

Akole : कळसच्या तरूण शेतकर्‍याचा उष्माघातामुळे दुर्दैवी मृत्यू

अकोले |प्रतिनिधी| Akole

तालुक्यातील कळस येथील एका 45 वर्षीय शेतकर्‍याचा उष्माघातामुळे दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी (दि. 26) दुपारी 3 वाजेच्या सुमारास संगमनेर येथे घडली. उष्माघाताचा अकोलेतील हा पहिला बळी ठरला आहे. दिगंबर जनार्दन वाकचौरे असे या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या शेतकर्‍याचे नाव आहे.
गेल्या काही दिवसांपासून अकोले व संगमनेर तालुका तीव्र उन्हामुळे भाजून निघत आहे. सुमारे 41 अंश सेल्सिअसपेक्षा पुढे तापमान जात आहे. या तीव्र उन्हामुळे मनुष्य जातीप्रमाणे मुक्या जनावरांनाही अतोनात त्रास होत आहे. प्रशासन उन्हाच्या यलो अलर्टच्या सूचना देत आहे. मात्र वेगवेगळ्या कारणांमुळे लोक त्या सूचनांकडे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र दिसत आहेत.

- Advertisement -

भरउन्हात लोकांना घराबाहेर कामानिमित्त पडावे लागत आहे. त्यातच लग्नसराई सुरू असल्याने मिळेल त्या साधनाने लोक कार्यक्रमांना जात असतात. या अतिउन्हामुळे शरीरावर विपरीत परिणाम होत आहे. दिगंबर वाकचौरे हे भरउन्हात कळसहून मोटारसायकलवर संगमनेर येथे गेले होते. तेथील पानसरे हॉस्पिटल येथे बहीण ऑपरेशनसाठी उपचार घेत आहे म्हणून तिला भेटण्यासाठी गेलेले असताना उन्हाचा त्रास झाला. त्रास होऊ लागल्यामुळे डॉ. पानसरे यांच्या हॉस्पिटलसमोरील हॉटेलमधून त्याने पिण्यासाठी थंड पाण्याची बाटली विकत घेतली व उकाडा अधिक जाणवत असल्याने व त्रास होत असल्याने त्यांनी पाणी बाटली डोक्यावर ओतली.

परंतु त्याला चक्कर येऊन तेथेच जमिनीवर कोसळून मृत झाले होते. त्यानंतर डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. तेथूनच एका रुग्णवाहिकेतून मृतदेह घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. तेथे सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल ढगे यांनी तातडीने शहर पोलीस ठाणे व ग्रामीण रुग्णालयाचे अधिकारी यांच्याशी संपर्क साधून पंचनामा करून शवविच्छेदन केले. याबाबत शहर पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी कविता व मुलगा यश वाकचौरे असा परिवार आहे.

ताज्या बातम्या