Sunday, November 8, 2026
Homeब्रेकिंग न्यूजकळवण : होलसेल किराणा दुकानाच्या गोडाऊनला आग; कोट्यावधी रुपयांचा माल जळून खाक

कळवण : होलसेल किराणा दुकानाच्या गोडाऊनला आग; कोट्यावधी रुपयांचा माल जळून खाक

लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच व्यापाऱ्याच्या स्वप्नांची राखरांगोळी

- Advertisement -

कळवण | प्रतिनिधी Kalwan

दिवाळीचा सण, लक्ष्मीपूजनाचा मंगल दिवस आणि बाजारपेठेत उत्साहाचे वातावरण असतानाच कळवण शहराला रविवारी सकाळी मोठा धक्का बसला. शहरातील सबस्टेशन ते कळवण खुर्द रस्त्यावरील राहुल अ‍ॅग्रो मॉलसमोरील आर. के. ट्रेडर्स या होलसेल किराणा मालाच्या गोडाऊनला सकाळी सहा ते साडेसहाच्या सुमारास भीषण आग लागली. पाहता पाहता आगीने सातही गाळे आपल्या विळख्यात घेतले आणि काही तासांतच कोट्यवधी रुपयांचा माल जळून खाक झाला.

या दुर्घटनेत सुमारे तीन ते साडेतीन कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. लक्ष्मीपूजनाचा दिवा लागण्यापूर्वीच गोडाऊनमधील लक्ष्मीची राख झाल्याने मालक प्रतीक राजेंद्र मालपुरे यांच्यासह संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

रविवारी पहाटेपासूनच कळवण शहरात लक्ष्मीपूजनाची लगबग सुरू होती. सकाळी सुमारे सहा ते सात वाजेदरम्यान कळवण खुर्द रस्त्यावरून जाणाऱ्या काही नागरिकांना गोडाऊनमधून धूर निघताना दिसला. काही क्षणांतच आगीने रौद्र रूप धारण केले. गोडाऊनमध्ये किराणा माल, तेलाचे डबे, प्लास्टिकचे खोके, पुठ्ठ्याचे बॉक्स मोठ्या प्रमाणावर असल्याने आग झपाट्याने पसरली.

आगीची माहिती वाऱ्यासारखी शहरात पसरली आणि शेकडो नागरिक घटनास्थळी धावले. स्थानिक रहिवासी, कार्यकर्ते आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी तात्काळ मदतकार्य सुरू केले. पाण्याचे टँकर, बादल्या, जे मिळेल ते घेऊन आग विझवण्याचा प्रयत्न सुरू झाला. मात्र, आगीची तीव्रता इतकी मोठी होती की, सामान्य प्रयत्नांनी ती आटोक्यात येणे शक्य नव्हते.

आर. के. ट्रेडर्सच्या माध्यमातून मालपुरे कुटुंबाकडे कळवण, सुरगाणा, बागलाण व देवळा या चार तालुक्यांची वितरक (डिस्ट्रिब्युशन) जबाबदारी आहे. या गोडाऊनमधून शेकडो छोट्या-मोठ्या किराणा दुकानदारांना होलसेल दरात मालाचा पुरवठा केला जातो.हिंदुस्तान लिव्हर, विप्रो, टाटा, संतूर, परिवार तेल यांसह सुमारे 15 नामांकित कंपन्यांचा माल या सात गाळ्यांमध्ये साठवलेला होता. दिवाळीच्या तोंडावर मागणी वाढल्याने गेल्या तीन दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर माल खरेदी करून गोडाऊनमध्ये आणून ठेवला होता. रविवारी सकाळीच तो माल तालुक्यातील दुकानदारांना वाटप करण्यात येणार होता. मात्र, नियतीने वेगळाच घात केला. वाटप होण्याआधीच संपूर्ण माल आगीच्या भक्ष्यस्थानी पडला.

आगीची माहिती मिळताच सर्वप्रथम कळवण नगरपंचायतीच्या अग्निशमन दलाचा बंब घटनास्थळी दाखल झाला. मात्र, सात गाळ्यांमध्ये पसरलेली आग पाहता एका बंबाने ती आटोक्यात येणे अशक्य होते. त्यामुळे तात्काळ अतिरिक्त मदत मागवण्यात आली.

नाशिक जिल्हा मजूर संघाचे संचालक रोहित पगार यांनी सटाण्याचे नगरसेवक राहुल पाटील व देवळा येथील माजी उपनगराध्यक्ष अतुल पवार यांच्याशी संपर्क साधला. त्यांच्या प्रयत्नातून सटाणा आणि देवळा येथूनही अग्निशमन बंब मागवण्यात आले.

कळवण, सटाणा व देवळा येथील अग्निशमन दलाच्या ३ बंबाच्या साहाय्याने तब्बल १२ पाण्याच्या ट्रिपा मारून आग आटोक्यात आणण्यात आली.अग्निशमन दलाच्या जवानांनी जीवाची पर्वा न करता आगीशी झुंज दिली. एका बाजूने पाण्याचा मारा, दुसऱ्या बाजूने आगीचा प्रसार रोखण्यासाठी प्रयत्न सुरू होते. जवळपास तीन ते चार तासांच्या अथक प्रयत्नांनंतर अखेर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. तोपर्यंत मात्र गाळ्यांमधील जवळपास सर्व माल जळून खाक झाला होता. गाळ्यांचे , पत्रे, शटरही आगीमुळे पूर्णपणे उद्ध्वस्त झाले.

या दुर्घटनेत कळवणकरांनी दाखवलेले धाडस आणि माणुसकी वाखाणण्याजोगी होती. आगीची तीव्रता मोठी असतानाही शेकडो नागरिकांनी घटनास्थळी थांबून अग्निशमन जवानांना सहकार्य केले. पाण्याची व्यवस्था, वाहतूक नियंत्रण, गर्दीला बाजूला करणे, जवानांना मदत करणे, अशी कामे नागरिकांनी स्वतःहून केली.

गोडाऊन शहराच्या बाहेरील भागात, मोकळ्या जागेत असल्याने आग आजूबाजूच्या वस्तीत पसरली नाही. त्यामुळे अधिक मोठा अनर्थ टळला, अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली. जर ही आग बाजारपेठेत किंवा दाट वस्तीत लागली असती, तर परिस्थिती अत्यंत भयानक झाली असती.

घटनेची माहिती मिळताच कळवण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांनी पोलीस पथकासह तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी संपूर्ण परिसराची पाहणी केली. घटनास्थळी गर्दी होऊ नये, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता. आगीचे कारण, नुकसानीचा अंदाज याबाबत पोलिसांकडूनही माहिती घेतली जात आहे.

प्राथमिक माहितीनुसार शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. मात्र, आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. विद्युत विभाग आणि अग्निशमन विभागाच्या तपासानंतरच खरे कारण समोर येईल..

लक्ष्मीपूजन हा व्यापाऱ्यांसाठी वर्षातील सर्वात मोठा दिवस. वर्षभराची मेहनत, उलाढाल आणि लक्ष्मीची कृपा याच दिवशी एकवटलेली असते. मालपुरे कुटुंबानेही यंदाची दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी करण्याची तयारी केली होती. नवीन माल, नवीन ऑर्डर, दुकानदारांचा उत्साह, सगळं काही सुरळीत सुरू होतं. मात्र, सकाळीच लागलेल्या आगीने सगळं स्वप्न उद्ध्वस्त केलं.

वर्षानुवर्षे मेहनतीने उभा केलेला व्यवसाय डोळ्यांसमोर जळताना पाहून मालकाला अश्रू अनावर झाले. कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार आणि व्यापारी बांधवांनी त्यांचे सांत्वन केले. संपूर्ण शहरात या घटनेबद्दल हळहळ व्यक्त होत आहे.

या दुर्घटनेमुळे मालपुरे कुटुंबावर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे. कोट्यवधींचा माल, गाळ्यांचे नुकसान, कंपन्यांची देणी, दुकानदारांचे पैसे, असे अनेक प्रश्न त्यांच्यासमोर उभे राहिले आहेत. पुन्हा व्यवसाय उभा करणे हे मोठे आव्हान असणार आहे.

त्यामुळे शासनाने तात्काळ नुकसानीचा पंचनामा करून नियमानुसार मदत करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. तसेच सामाजिक संस्था, व्यापारी संघटना, दानशूर व्यक्तींनीही कुटुंबाला पुन्हा उभे राहण्यासाठी हातभार लावावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

ताज्या बातम्या

Pathardi : भगवानगडाच्या पायथ्याशी विहिरीत आढळले आठ दुचाकीचे सांगाडे

0
पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi पाथर्डी तालुक्यातील भगवानगडाच्या (Bhagwangad) पायथ्याशी घोगस पारगाव रस्त्यालगत असलेल्या जुन्या विहिरीमध्ये (Well) तब्बल आठ दुचाकीचे सांगाडे व अवशेष आढळून आल्याने...