Sunday, May 5, 2024
Homeनगरलोकशाही वाचविण्यासाठी प्रत्येकाने देश हिताचे काम करावे - कन्हैयाकुमार

लोकशाही वाचविण्यासाठी प्रत्येकाने देश हिताचे काम करावे – कन्हैयाकुमार

संगमनेर |प्रतिनिधी| Sangmner

भारत हा विविध संस्कृती, जात – धर्म, वेष, भाषा असलेला देश आहे. ही विविधता समृद्ध करत एकात्मता वाढवण्यासाठी

- Advertisement -

लोकशाहीने महत्त्वाचे काम केले आहे. मात्र सध्या देशातील लोकशाही संकटात असून ती वाचविण्यासाठी प्रत्येकाने देशहिताचे काम करावे,असे आवाहन कॉम्रेड कन्हैया कुमार यांनी केले आहे.

जयहिंद लोक चळवळीच्या वतीने आयोजित लोकशाही या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिसंवादात ते बोलत होते. यामध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात, ज्येष्ठ विचारवंत संजय आवटे, इंग्लंडमधून कार्लस टोर्नर, प्रसिद्ध कायदे तज्ञ अ‍ॅड. असीम सरोदे, जर्मनीच्या मायकल क्राऊली, अमेरिकेचे जेरमी क्लेम, हिरालाल पगडाल आदींनी सहभाग घेतला.

यावेळी अमृतवाहिनीच्या द्रोणागिरीतील मुख्य व्यासपीठावर जयहिंदचे संस्थापक अध्यक्ष आमदार डॉ. सुधीर तांबे, नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, अ‍ॅड. अमित सोनवणे, उत्कर्षा रुपवते, समन्वयक संदीप खताळ, उत्तमराव जगधने, अशोकराव खैरनार, डॉ. सुरज गवांदे, किशोर गोरे, प्रदीप नेहे आदी उपस्थित होते.

याप्रसंगी कन्हैयाकुमार म्हणाले, भारताला सत्य अहिंसेची मोठी परंपरा आहे. महात्मा गांधींनी या तत्त्वातून देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. प्रत्येकाला राज्य घटनेने समानतेचा अधिकार दिला. लोकशाहीमुळे देशाची सर्व क्षेत्रात प्रगती झाली असून सध्या ही लोकशाही काही शक्ती मोडून त्याठिकाणी हुकूमशाही लादू पाहत आहेत. लोकशाहीचे स्तंभ केंद्रीय सत्तेचा मर्जीनुसार काम करत आहे हे चिंताजनक आहे.

प्रशासन राज्य घटनेला बांधील असले पाहिजे मात्र ते सत्ताधार्‍यांची मनधरणी करत आहेत. माध्यमे फक्त टीआरपीच्यामागे धावत आहेत. त्यामुळे माध्यमांवरील विश्वास ही शंकास्पद ठरला आहे. देशांमध्ये हाथरसची अत्यंत दुर्दैवी घटना घडली. तेथे लोकशाहीची सर्व मूल्ये पायदळी तुडवली गेली. गोरगरिबांना आपल्या व्यथा मांडता येत नाहीत. अशा परिस्थितीत विरोधकांनी आवाज उठवला पाहिजे.

मात्र विरोधकांचा आवाज दाबण्याचे काम सत्ताधारी करत आहेत. लोकशाही फक्त राजकीय क्षेत्रापुरती मर्यादित नसून प्रत्येक क्षेत्रात लोकशाही वाढली पाहिजे. गल्ली ते संसदेपर्यंत लोकशाहीची मूल्ये आपण प्रत्येकाने जगली तरच यापुढील काळामध्ये लोकशाही समृद्ध ठेवू शकतो. प्रत्येक नागरिकाने लोकशाहीचे मूल्य सत्य मार्गाने जपत काम करावे ,असे आवाहन त्यांनी केले.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात म्हणाले, जयहिंदच्या ग्लोबल कॉन्फरन्समुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर पुरोगामी विचार व भारतीय संस्कृतीचे मोठे व्यासपीठ निर्माण झाले आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधींचा विचार घेऊन मागील 20 वर्षांपासून अहमदनगर जिल्ह्यात जयहिंद लोकचळवळ काम करत आहे.

राज्यघटनेवर विश्वास असणार्‍या या पुरोगामी विचाराच्या चळवळीने सुसंस्कृत तरुण उभे केले आहेत. त्यांच्या माध्यमातून सुदृढ समाज निर्मितीसाठी काम सुरू आहे. मात्र सध्या देशामध्ये धार्मिक तेढ निर्माण करून राजकारण केले जात आहे हे अत्यंत चिंताजनक असल्याचे ना. थोरात म्हणाले.

संजय आवटे म्हणाले, समता व बंधुता हा लोकशाहीचा पाया आहे. मात्र सध्या देशामध्ये समतेच्या तत्वाला सुरुंग लावला जात आहे. अनेक राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमा मलिन करण्याचे काम केले जात आहे. विरोधकांचा आवाज बंद केला जात आहे. उथळ प्रसिद्धीला महत्त्व दिले जात असून माध्यमांच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह आहेत.

देशात पायाभूत सुविधा निर्माण करण्यात असमर्थ ठरलेल्या मध्यवर्ती सरकारने जातीय त्याला प्राधान्य दिले असल्याची टीका त्यांनी केली. इंग्लंडमधून कार्लस टोर्नर, प्रसिद्ध कायदे तज्ञ अ‍ॅड. असीम सरोदे, जर्मनीच्या मायकल क्राऊली, अमेरीकेचे जेरमी क्लेम, हिरालाल पगडाल आदींनी सहभाग घेतला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक जयहिंद लोक चळवळीचे संस्थापक अध्यक्ष आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केले. सूत्रसंचालन उत्कर्षा रूपवते व अ‍ॅड. गवांदे यांनी केले तर अशोकराव खैरनार व संदीप खताळ यांनी आभार मानले.

- Advertisment -

ताज्या बातम्या