पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi
‘अलख निरंजन’चा घोष आणि चैतन्य कानिफनाथांच्या जयजयकारात शंख, ताशा व डफाच्या गजरात रंगपंचमीच्या दिवशी श्री क्षेत्र मढी येथे भाविकांचा प्रचंड जनसागर उसळला. राज्यासह गुजरात, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातून आलेल्या सुमारे आठ लाख भाविकांनी रविवारी चैतन्य कानिफनाथांच्या संजीवन समाधीचे दर्शन घेतले. रंगपंचमी हा नाथांचा समाधी दिन असल्याने यात्रेत यंदा आतापर्यंतचा गर्दीचा उच्चांक झाल्याचे पाहायला मिळाले.
नाथसंप्रदायात मढी हे नाथशक्ती स्थान म्हणून मानले जाते. त्यामुळे रंगपंचमीच्या दिवशी अठरापगड भटक्या जातींचे तसेच नाथ परंपरा पाळणार्या भाविकांचे येथे मोठ्या श्रद्धेने आगमन होते. अनेक भाविक येथे मुक्काम करून विविध धार्मिक विधी पार पाडतात. यंदा बाहेरगावाहून आलेल्या नाथसंप्रदायातील साधू-संत व व्यावसायिकांचीही मोठी गर्दी पाहायला मिळाली.
सुमारे चारशे एकर परिसर यात्रामय झाला होता. पैठणकडे जाणार्या अनेक दिंड्या यंदा मढीमार्गे आल्याने शनिवारी दुपारपासूनच भाविकांची गर्दी वाढू लागली. ही गर्दी रविवारी सायंकाळपर्यंत कायम होती. पुणे, पनवेल, छत्रपती संभाजीनगर, ठाणे, कल्याण आणि नाशिक या भागांतील भाविकांची संख्या सर्वाधिक होती. मढीपासून सुमारे पाच किलोमीटरच्या परिसरात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. देवकाठ्यांची मोठी गर्दी आणि गडाकडे जाणार्या भाविकांच्या रांगा यामुळे मार्ग फुलून गेला होता. राज्यातील विविध भागांतून आलेल्या हजारो देवकाठ्या मंदिराच्या कळसाला लावण्यात आल्या.
मढीची प्रसिद्ध गोडीशेव आणि रेवडी यांची यात्रेत मोठी विक्री झाली. हलवाई व्यवसायात सर्वाधिक आर्थिक उलाढाल झाली असून शेकडो टन रेवड्या तयार करण्यात आल्याची माहिती मिळाली. रेवडीचा दर सुमारे 200 रुपये किलो इतका होता. यात्रेदरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे तसेच मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेते भाऊसाहेब शिंदे यांनीही मढीला भेट देत चैतन्य कानिफनाथांच्या समाधीचे दर्शन घेतले.
दरम्यान, सकाळपासूनच वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली होती. दुपारी तीननंतर वाहतूक सुरळीत झाली. गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनीही हात साफ केला असून सुमारे पन्नासहून अधिक भाविकांचे मोबाईल, पैसे आणि सोन्याचे दागिने चोरीला गेल्याच्या घटना घडल्या. मढी-तिसगाव, मढी-निघोज तसेच मढी-धामणगाव-पाथर्डी मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज चौक ते एसटी स्थानक दरम्यान मोठी वाहतूक कोंडी झाली होती. मंदिर परिसर आणि समाधी मंदिराचा गाभारा आकर्षक फुलांनी सजवण्यात आला होता. विद्युत रोषणाई आणि फटाक्यांच्या आतषबाजीमुळे संपूर्ण मढी परिसर उजळून निघाला. याशिवाय यात्रेत आलेल्या लोकनाट्य मंडळे व ऑर्केस्ट्रामुळे तमाशा रसिकांसह यात्रेकरूंनी मनोरंजनाचाही आनंद घेतला.





