Monday, September 28, 2026
HomeनगरAhilyanagar : कापूरवाडीच्या माळरानावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय?

Ahilyanagar : कापूरवाडीच्या माळरानावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय?

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

जिल्ह्यासाठी मंजूर झालेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. या महाविद्यालयाच्या भव्य इमारतीसाठी नगर तालुक्यातील कापूरवाडी येथील 25 एकर जागा जवळपास निश्चित करण्यात आली आहे. नवीन इमारत उभी होईपर्यंत, चालू शैक्षणिक वर्षापासून या महाविद्यालयाचे प्रशासकीय कामकाज जिल्हा आयुर्वेदिक रुग्णालय (आयुष) च्या इमारतीमधून सुरू होणार आहे. तसेच, शहरातील सिव्हिल हॉस्पिटल हे पुढील सात वर्षांसाठी वैद्यकीय महाविद्यालयाकडे हस्तांतरित केले जाणार आहे.

- Advertisement -

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने सुरू होणार्‍या या पहिल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता (डीन) पदी डॉ. अविनाश लांब यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नीटफ परीक्षेचा निकाल लागल्यानंतर, आगामी शैक्षणिक वर्षात एमबीबीएसच्या शासकीय कोट्यातून 100 जागांवर प्रवेश देण्याचे नियोजन आहे. साधारण सप्टेंबर महिन्यापासून प्रथम वर्षाचा अभ्यासक्रम सुरू होईल. या महाविद्यालयाला संलग्न म्हणून जिल्हा सामान्य रुग्णालयात (सिव्हिल हॉस्पिटल) 430 खाटांचे रुग्णालय कार्यरत केले जाईल. यासाठी आवश्यक पदनिर्मिती आणि बांधकामासाठी सुमारे 500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अखत्यारितील हे रुग्णालय, मनुष्यबळासह पुढील किमान 7 वर्षांसाठी वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाकडे निःशुल्क वर्ग करण्यात आले आहे.

448 पदांची निर्मिती; बाह्य स्रोतांवर भर
महाविद्यालयासाठी 448 पदांच्या निर्मितीचा शासन निर्णय एप्रिल महिन्यातच जारी करण्यात आला आहे. यामध्ये नियमित पदे (185) गट अ 48, गट ब 44, आणि गट क 93. तर बाह्य स्रोत 204 पदे भरण्यात येणार आहे. यात स्वच्छता, आहार, सुरक्षा आणि वस्त्र स्वच्छता या सेवा कंत्राटी पद्धतीने भरल्या जातील.

कापूरवाडीचीच जागा का निवडली ?
कापूरवाडी येथे सुमारे 250 एकर शासकीय जमीन उपलब्ध आहे.यातील बहुतांश जमीन डोंगर उताराची असली, तरी महाविद्यालयासाठी आवश्यक असलेली 25 एकर सपाट जागानिवडून तेथे बांधकाम केले जाईल. यापूर्वी अरणगाव येथील कुष्ठरोग विभागाची जागा न्यायालयीन वादामुळे, तर अमरधाम आणि काटवन खंडोबा दरम्यानची जागा सीना नदीचा पट्टा आणि अपुर्‍या क्षेत्रामुळे बाद करण्यात आली असल्याचे सुत्रांनी सांगितले.

आयुष रुग्णालयाची मात्र पुन्हा फरफट
केंद्र सरकारच्या निधीतून मोठ्या गाजावाजाने उभारण्यात आलेल्या आयुष रुग्णालयात सध्या नागरिकांना आयुर्वेदिक उपचार मिळत आहेत. मात्र, आता ही इमारत वैद्यकीय महाविद्यालयाच्या कार्यालयासाठी वापरली जाणार असल्याने, आयुष विभाग पुन्हा अन्यत्र हलवण्याच्या हालचाली सुरू आहेत. यामुळे या विभागाची आणि उपचारासाठी येणार्‍या रुग्णांची पुन्हा एकदा फरफट होणार आहे.

ताज्या बातम्या

Rahata : राहाता बाजार समितीतील डाळिंबाचा वाचा भाव

0
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata सोमवारी राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) डाळिंबाला प्रतिकिलोला 360 रुपये भाव मिळाला. राहाता बाजार समितीत डाळिंबाच्या 5153 कॅरेटची आवक झाली....