Tuesday, November 24, 2026
HomeनगरAMC : महापालिका कर्मचार्‍यांचे धरणे आंदोलन

AMC : महापालिका कर्मचार्‍यांचे धरणे आंदोलन

कामकाज ठप्प || 130 कोटींच्या थकीत देण्यांसह सण अग्रीमची मागणी

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

महानगरपालिकेच्या कर्मचार्‍यांचे दिवाळी सण अग्रीम तसेच सुमारे 130 कोटी रूपयांपेक्षा अधिक थकीत देणी तातडीने अदा करावीत, या मागणीसाठी महानगरपालिका कामगार युनियनच्या वतीने सोमवार (23 नोव्हेंबर) पासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. या आंदोलनामुळे महापालिकेचे कामकाज ठप्प झाले आहे.

- Advertisement -

कामगार युनियनने आयुक्त यशवंत डांगे यांना निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानंतर आयुक्तांसोबत बैठकही झाली; मात्र या बैठकीत कोणतीही सकारात्मक चर्चा न झाल्याने कर्मचार्‍यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. महाराष्ट्रातील विविध शासकीय कार्यालयांमध्ये तसेच महानगरपालिकांमध्ये कर्मचार्‍यांना दिवाळी सणापूर्वी सण अग्रीम दिले जाते.

मात्र, अहिल्यानगर महानगरपालिका प्रशासनाकडून यंदा दिवाळी सण होऊनही कर्मचार्‍यांना अद्याप सण अग्रीम देण्यात आलेले नाही. याशिवाय कर्मचार्‍यांची सुमारे 130 कोटी रूपयांपेक्षा अधिक रक्कम थकीत आहे. त्यामुळे कर्मचार्‍यांमध्ये प्रशासनाविरोधात मोठी नाराजी निर्माण झाली आहे. महापालिकेचे कर्मचारी नियमित कामकाजाबरोबरच जनगणना, एसआयआर आणि निवडणुकीसारखी अतिरिक्त जबाबदारीही प्रामाणिकपणे पार पाडत आहेत. महापालिका निवडणूक प्रक्रियेतही कर्मचार्‍यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. मात्र, निवडणुकीच्या कामाचा मोबदला अद्याप महापालिका कर्मचार्‍यांना मिळालेला नाही.

राज्य शासनाकडून मिळणारे अनुदान वेळेवर प्राप्त होत नसल्यास कर्मचार्‍यांचे वेतनही वेळेवर होत नाही. एकीकडे कर्मचारी नियमित कामकाजासह अतिरिक्त जबाबदार्‍या पार पाडत असताना त्यांच्या हक्काची देणी आणि सण अग्रीम मिळत नसल्याने कर्मचार्‍यांवर अन्याय होत असल्याची भावना युनियनने व्यक्त केली. या आंदोलनावेळी युनियनचे अध्यक्ष बाबासाहेब मुदगल, जितेंद्र सारसर, सरचिटणीस आनंदराव वायकर, कार्याध्यक्ष नंदकुमार नेमाने, महादेव कोतकर, अजय सौदे, उपाध्यक्ष अमोल लहारे आदी उपस्थित होते.

ताज्या बातम्या

Crime News : व्यावसायिकावर चॉपरने हल्ला करून जीवे मारण्याची धमकी

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar मेंबरसोबत राहतो म्हणत माजी नगरसेवक सचिन जाधव याच्यासह चौघांनी एका हॉटेल व्यावसायिकाला अडवून मारहाण केली. चॉपरसारखे धारदार शस्त्र काढून हल्ला केला. त्यात...