तिसगाव |वार्ताहर| Tisgav
प्रधानमंत्री कृषी सिंचन पाणलोट विकास योजनेंतर्गत मृद व जलसंधारण विभाग तसेच कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने अहिल्यानगर जिल्ह्यात सुरू असलेली पाणलोट (वॉटरशेड) यात्रा आज (दि.17) पाथर्डी तालुक्यातील करंजी येथे येणार होती. परंतु अचानक संपूर्ण कार्यक्रमच रद्द झाल्याने करंजीसह परिसरात गावातील गटातटाच्या राजकारणाबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. वॉटर शेड यात्रेच्या रथाला घाटाच्यावरच ब्रेक लागल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
करंजीसह दगडवाडी, सातवड, घाटशिरस या गावांचा या पाणलोट विकास अभियानामध्ये समावेश करण्यात आला असून हे अभियान यशस्वी करण्यासाठी या चार गावांतील शेतकर्यांचे वेगवेगळे शेतकरी कंपनी गट स्थापन करण्यात आलेले आहेत. चार गावांची एक समिती देखील स्थापन करण्यात आली आहे. परंतु या समितीच्या निवडीबाबतही लाभधारक गावांतील लोक अनभिज्ञ आहेत. गाव पातळीवरील समितीचा पदसिद्ध अध्यक्ष म्हणून सरपंच आहेत. परंतु करंजी सारख्या मोठ्या गावामध्ये ठराविक शेतकर्यांनाच या गट शेतीमध्ये समाविष्ट करण्यात आले असून अनेक शेतकर्यांनी कागदपत्र देऊन देखील त्यांचा या शेतकरी गटात समावेश केला नसल्याचे शेतकरी आसाराम अकोलकर यांनी म्हटले आहे.
पाणलोट विकास समितीमध्ये जाणीवपूर्वक काही शेतकर्यांना वगळून नवीन कमिटी स्थापन करण्यात आली. सत्ताधारी गटाने हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पूर्ण नियोजन केले अन विरोधी गटाला या कार्यक्रमातून बाजूला ठेवण्याचा देखील पद्धतशीरपणे प्रयत्न केला परंतु ऐनवेळी हा कार्यक्रमच रद्द झाल्याने ग्रामपंचायत सदस्य नवनाथ आरोळे यांनी नाराजी व्यक्त केली. गावोगावी मृद व जलसंधारणाचे महत्व भावी पिढीसह नागरिकांना पटवून देण्यात ही रथयात्रा महत्वाची भूमिका पार पाडणार आहे.
या यात्रेदरम्यान पाणलोट अंतर्गत नवीन कामांचे भूमिपूजन, झालेल्या कामांचे जलपूजन तसेच लोकार्पण, वृक्षलागवड, जुन्या पाणलोट कामांची दुरुस्ती, भूमी जलसंवाद, श्रमदान आदी उपक्रमांचा समावेश आहे. यात्रेत दृकश्राव्य पद्धतीचे फिरते मोटार वाहन राहणार असून गावकर्यांना आभासी पाणलोट सहलीचा अनुभव घेता येणार आहे. गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजनेतून शेतकर्यांना धरण व तलावातील गाळ शेतात टाकण्यासाठी प्रोत्साहीत केले जाणार आहे.
ग्रामसभेतून आमची पाणलोट विकास समितीमध्ये निवड झालेली आहे. परंतु ग्रामपंचायतमध्ये सत्ता बदल होताच आम्हाला जाणीवपूर्वक बाजूला करण्यात आले. त्या ठिकाणी राजकारण करण्यात आले नवीन पाणलोट समिती देखील ग्रामसभेतून निवडलेली नाही असा आरोप शेतकरी, कंपनी प्रतिनिधी आसाराम अकोलकर, राहुल अकोलकर यांनी केला आहे.
नवीन पाणलोट समिती ठराव घेऊनच करण्यात आलेली आहे. ज्या शेतकर्यांनी ग्रामपंचायतकडे शेती गटासाठी कागदपत्र जमा केली त्यांचा शेतकरी गटामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. ज्यांनी ग्रामपंचायतीकडे कागदपत्रेच दिलेली नाहीत त्यांनी ग्रामपंचायतीकडे बोट करू नये, असे उपसरपंच गणेश अकोलकर यांनी म्हटले आहे.