कर्जत । प्रतिनिधी
कर्जत तालुक्यातील रेहेकुरी येथे शेताच्या बांधाच्या वादातून दिव्यांग असलेल्या शेतकऱ्यास मारहाण झाल्याची घटना घडली असून या प्रकरणी चौघांविरुद्ध कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी प्रहार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड यांची भेट घेऊन निवेदन दिले यावेळी प्रहार संघटनेच्या राज्य कार्यकारणी सदस्य व दिव्यांग सेलच्या अहिल्यानगर जिल्ह्याच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष लक्ष्मी देशमुख तालुका अध्यक्ष दत्तात्रय तनपुरे, महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष प्रमिला तनपुरे, वृद्ध भूमिहीन शेतमजूर संघटनेचे जिल्हाध्यक्ष शब्बीर भाई पठाण मच्छिंद्र महाराज भुजबळ कांतीलाल भिसे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
फिर्यादीनुसार, रेहेकुरी येथील सचिन रायचंद लोखंडे (वय ३७) यांनी याबाबत कर्जत पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारदार हे शेती व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असून त्यांना शासनाचे ४० टक्के दिव्यांग प्रमाणपत्र असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
फिर्यादीनुसार, शेताच्या बांध आणि सिमेंट पोल उभारणीच्या कारणावरून वाद निर्माण झाला. या वादातून आरोपींनी शेतात जाऊन तक्रारदारास शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी व काठीने मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच तक्रारदाराच्या अपंगत्वाचा फायदा घेत मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
या घटनेत तक्रारदारासह त्यांच्या कुटुंबीयांनाही मारहाण करून दुखापत झाल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. वाद मिटविण्यासाठी आलेल्या कुटुंबीयांनाही धक्काबुक्की व मारहाण झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
या प्रकरणात श्रीराम नवनाथ लोखंडे, नवनाथ रामा लोखंडे, पल्लवी श्रीराम लोखंडे आणि अशाबाई नवनाथ लोखंडे (सर्व रा. रेहेकुरी, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून कर्जत पोलीस पुढील तपास करत आहेत.




