अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
नगर शहरासह दक्षिण जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने अक्षरशः धुमाकुळ सुरू केला आहे. या पावसामुळे शेती पिकांसह नागरिकांच्या घरांचे नुकसान होताना दिसत आहे. सोमवारी रात्री ते मंगळवारी सायंकाळपर्यंत दोघांचा पावसामुळे बळी गेला असून, यात नगर शहरात एका 18 वर्षीय तरुणीचा आणि कर्जतमध्ये 63 वर्षीय वृद्धाचा समावेश आहे.
दरम्यान, नगरच्या कापड बाजारात एका इमारतीचा काही भाग पावसाने कोसळला. मंगळवारी नगर शहरात दुपारी 12 च्या सुमारास मुसळधार पाऊस सुरू झाला. या पावसात सारसनगर भागातील एका बंगल्याचा स्लॅब कोसळून 18 वर्षीय तनवी रासने हिचा मृत्यू झाला. तनवी दुचाकीवरून घरी आली आणि गाडी लावून घरात प्रवेश करत असताना पोर्चचा स्लॅब कोसळला व ती जागीच ठार झाली. यावेळी नागरिक व मनपा आपत्कालीन विभागातील कर्मचारी आणि परिसरातील नागरिकांनी तनवीचा मृतदेह बाहेर काढला.
या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये शोककळा पसरली होती. याचबरोबर सीना नदीला आलेल्या पुरामुळे बुरडगावचा संपर्क तुटला होता. याचबरोबर कल्याण राष्ट्रीय महामार्ग दिवसभर बंद होता. जोराच्या पावसामुळे ठिकठिकाणी नागरिकांच्या घरात पाणी घुसले होते. तसेच कर्जत तालुक्यातील हजीबा मोहन सुपेकर (रा. खेड, ता. कर्जत) यांची घराची भिंत कोसळून त्यात सुपेकर यांचा मृत्यू झाला. सोमवारी जिल्हा प्रशासनाकडील आकडेवारीनुसार जिल्ह्यात एकाच दिवशी सर्वाधिक पाऊस खेड या ठिकाणी 136 मिलीमीटर झाल्याची नोंद झाली आहे.