Wednesday, September 30, 2026
HomeनगरAhilyanagar : जिल्हा बँकेसाठी शिंदे गटही उतरविणार उमेदवार

Ahilyanagar : जिल्हा बँकेसाठी शिंदे गटही उतरविणार उमेदवार

निरीक्षक राम रेपाळेंच्या उपस्थितीत नगरमध्ये बैठक

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे गट) पदाधिकार्‍यांना विश्वासात घेतले जात नसल्याची भावना व्यक्त करत, निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय शिंदे गटाने घेतला आहे. मंगळवारी नगरमध्ये झालेल्या पक्षाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. पक्षाचे निरीक्षक राम रेपाळे यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीमुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील राजकीय समीकरणांची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे.

- Advertisement -

जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी नगर येथील शासकीय विश्रामगृहावर शिवसेनेच्या शिंदे गटाच्या प्रमुख पदाधिकार्‍यांची बैठक झाली. या बैठकीसाठी ठाण्याहून निरीक्षक राम रेपाळे उपस्थित होते. खासदार भाऊसाहेब वाकचौरे, माजी खासदार सदाशिव लोखंडे, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, सिद्धार्थ मुरकुटे, जिल्हा परिषदेच्या माजी सभापती हर्षदा काकडे, सुजित झावरे, जिल्हाध्यक्ष अनिल शिंदे, संभाजी कदम, बाबुशेठ टायरवाले यांच्यासह अन्य पदाधिकार्‍यांची उपस्थिती होती.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महायुतीतील इतर घटक पक्षांशी चर्चा होत असताना शिंदे गटाला मात्र विश्वासात घेतले जात नसल्याची नाराजी बैठकीत व्यक्त करण्यात आली. त्यामुळे केवळ चर्चेपुरते मर्यादित न राहता निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची भूमिका पदाधिकार्‍यांनी मांडली. त्यानुसार, पुढील दोन दिवसांत पक्षाच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती बैठकीनंतर देण्यात आली.

काँग्रेस चालते, मग शिवसेना का नको?
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपला काँग्रेससोबत चर्चा करणे मान्य असेल, तर महायुतीतील शिवसेनेला सोबत घेण्यास अडचण काय, असा सवाल बैठकीत उपस्थित करण्यात आल्याचे समजते. जिल्ह्यात जिल्हा नियोजन समितीसह अन्य ठिकाणीही भाजपकडून शिंदे गटाला विश्वासात घेतले जात नसल्याचा आरोप पदाधिकार्‍यांनी केला. जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील भूमिकेवरून महायुतीतील घटक पक्षांमधील समन्वयाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

आमदारांची बैठकीकडे पाठ?
नगरच्या शासकीय विश्रामगृहावर झालेल्या बैठकीला शिंदे गटाचे आमदार उपस्थित नसल्याचे दिसून आले. याबाबत निरीक्षक राम रेपाळे यांना विचारले असता, संबंधित आमदार पक्षासोबत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, आमदारांच्या अनुपस्थितीबाबत बैठकीत काही पदाधिकार्‍यांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतर्गत समन्वयाचाही मुद्दा चर्चेत आला आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : अर्ज खरेदीला इच्छुकांच्या उड्या

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांकडून प्रयत्न सुरू असतानाच उमेदवारी अर्ज खरेदीसाठी इच्छुकांची झुंबड उडाली आहे. उमेदवारी अर्ज विक्रीच्या...