Friday, September 11, 2026
Homeनगरधक्कादायक! खर्डा येथे भरदिवसा कोयत्याने वार करून दूध व्यावसायिक चालकाची हत्या

धक्कादायक! खर्डा येथे भरदिवसा कोयत्याने वार करून दूध व्यावसायिक चालकाची हत्या

जामखेड । तालुका प्रतिनिधी

जामखेड रस्त्यावरील जातेगाव फाट्याजवळ शुक्रवारी सकाळी पावणेबारा वाजेच्या सुमारास एका दूध वाहतूक चालकावर ३ ते ४ अनोळखी इसमांनी कोयत्याने प्राणघातक हल्ला करून त्याची निर्घृण हत्या केली. या थरारक घटनेमुळे खर्डा शहरासह संपूर्ण परिसरात तीव्र घबराट पसरली असून खळबळ उडाली आहे. तानाजी भास्कर बोराडे (वय ४०, रा. माळेवाडी, ता. भूम, जि. धाराशिव) असे या घटनेत मृत्यू झालेल्या दुध व्यावसायिक चालकाचे नाव आहे.

- Advertisement -

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, तानाजी बोराडे हे माळेवाडी येथील कैलास धर्मा आल्हाट यांच्या पिकअप वाहनावर (क्रमांक MH – 12 KP – 5626) चालक म्हणून काम करत होते. ते दररोज माळेवाडी परिसरातून संकलित केलेले दूध घेऊन खर्डा येथे येत असत. नेहमीप्रमाणे शुक्रवारी सकाळी दूध घातल्यानंतर, काही अनोळखी इसमांनी बोराडे यांना जातेगाव फाट्याजवळ बोलावून घेतले.

बोराडे तेथे पोहोचल्यानंतर संशयितांनी त्यांच्याशी वाद घालत अचानक मारहाण करण्यास सुरुवात केली. वाद सुरू असतानाच एका इसमाने बोराटे यांच्या मानेवर कोयत्याने सपासप वार केले. हा वार इतका भीषण आणि प्राणघातक होता की तानाजी बोराडे रक्ताच्या थारोळ्यात जागीच कोसळले. बोराडे जमिनीवर कोसळताच आरोपींनी तातडीने तेथून पळ काढला.

घटनेची माहिती मिळताच खर्डा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) उज्ज्वलसिंह राजपूत हे आपल्या पथकासह तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या गंभीर जखमी बोराटे यांना रुग्णवाहिकेतून जामखेड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी रवाना केले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच वाटेत त्यांचा मृत्यू झाला असल्याचे तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती घोषित केले. घटनेचे गांभीर्य ओळखून सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्ज्वलसिंह राजपूत यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना याबाबतची माहिती दिली असून, घटनास्थळावरून महत्त्वाचे पुरावे गोळा करण्यासाठी फॉरेन्सिक (न्यायवैद्यक) टीमला पाचारण केले आहे.

भरदिवसा मुख्य रस्त्यावर घडलेल्या या हत्याकांडामुळे खर्डा शहरात विविध चर्चांना उधाण आले असून, हा खून जुन्या वैमनस्यातून झाला की अन्य काही कारणातून, याचे गूढ अद्याप कायम आहे. पोलीस सर्व संशयित कोनांतून या प्रकरणाचा सखोल तपास करत असून फरार आरोपींचा माग काढण्यासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास एपीआय उज्ज्वलसिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली खर्डा पोलीस करत आहेत

ताज्या बातम्या

मराठा समाज दुखावला, एकेरी भाषेत बोलाल तर…; शिंदे गटाच्या नेत्याचा मनोज...

0
धाराशिव । Dharashiv मराठा आरक्षणाच्या तीव्र लढ्याने संपूर्ण महाराष्ट्रात राजकीय आणि सामाजिक वातावरण पूर्णपणे ढवळून निघाले आहे. अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण...