Monday, November 25, 2024
Homeनगरगावतळ्यात पाणी न सोडल्याने खोकरला तीव्र पाणीटंचाई

गावतळ्यात पाणी न सोडल्याने खोकरला तीव्र पाणीटंचाई

जुन्या विहिरीच्या आडव्या बोअरने साथ दिल्याने गाव टँकरमुक्त-चक्रनारायण

भोकर |वार्ताहर| Bhokar

श्रीरामपूर तालुक्यातील खोकर ग्रामपंचायतीने जुन्या विहिरीचा जिर्णोद्धार करत आडवे बोअर घेऊन, जुन्या पाईपलाईनला नवीन व्हॉल्व टाकून, मुख्य वाहिनीचे अनधिकृत कनेक्शन तोडून गावच्या पिण्याच्या पाणी टंचाईवर मात करण्याचा यशस्वी प्रयत्न केल्याने ग्रामस्थांत समाधान व्यक्त होत आहे, अशी माहिती बाजार समितीचे संचालक राजू चक्रनारायण यांनी दिली, मात्र दुसरीकडे ऐन कडक उन्हाळ्यात सुटलेल्या आवर्तनात पिण्याच्या पाण्यासाठी प्राधान्य असतानाही गावतळ्यात पाणी न दिल्याने ग्रामस्थांसह गावच्या कारभार्‍यांनी पाटबंधारे विभागाच्या कारभाराबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.

- Advertisement -

खोकर तसे तीव्र पाणीटंचाईचे गाव, येथील महिलांच्या डोक्यावर नेहमीच पिण्याच्या पाण्यासाठी हंडा व पुरूषांच्या सायकलला प्लास्टीक कॅन लावून नियमीत भटकंती सुरू होती. त्यातच त्याकाळी काही धनदांडग्यांचा मोठा तोरा होता, यातून अनेकदा या ग्रामस्थांची पाण्यासाठी हेळसांड केली जायची. परंतु माजी आमदार स्व. जयंतराव ससाणे यांच्याकडे आमदारकी आली त्यावेळी त्यांनी पाणीटंचाई दुर करण्याचा शब्द दिला. तो त्यांनी पाळत खोकर गावासाठी टाकळीभान टेलटँक येथून ‘भारत निर्माण’ योजनेअंतर्गत विहीर, पाईपलाईन व पाण्याची टाकी मंजूर करवून ती योजना कार्यान्वित केली. त्यामुळे गावची पाणीटंचाई दूर झाली.

नागरिकांची पिण्याच्या पाण्यासाठीची भटकंती थांबून दारात नळाद्वारे पाणी आले. पण पुढे कारभारी बदलत गेले तशी या योजनेची वाताहात झाली. पुन्हा गाव पिण्याच्या पाण्याच्या टंचाईत डुबले. पुन्हा पाणीटंचाई वाढू लागली, तशी नागरिकांची उन्हाळ्यातील पिण्याच्या पाण्यासाठीची भटकंती सुरू झाली. त्यावर मात करण्यासाठी गेल्या वर्षी येथील उपसरपंच दीपक काळे, ग्रामपंचायत सदस्य आबा पवार, ताजखाँ पठाण, अमिन सय्यद व संबंधितांच्या मित्रमंडळाने गेल्या वर्षी चक्क स्वखर्चाने टँकरद्वारे ग्रामस्थांना पिण्याचे पाणी पुरवत पाणीटंचाईवर मात करत उन्हाळा पार केला. बाजार समितीचे संचालक राजू चक्रनारायण यांच्या मार्गदर्शनाखाली येथील सरपंच आशाबाई चक्रनारायण, उपसरपंच दीपक काळे व सदस्य मंडळाने वेळीच सावध होत, येथील श्रीक्षेत्र खंडोबा मंदिरासमोरील गावतळ्यालगतच्या विहिरीची साफसफाई केली. या विहिरीत सात आडवे बोअर घेत नशीब आजमावले, अन् नशीबाने साथ दिली. या आडव्या बोअरला चांगल्या प्रमाणात जलस्त्रोत मिळाले. यांनी लागलीच हे पाणी खंडोबा मंदिरामागील पाण्याच्या टाकीत टाकून उर्वरीत पाणी सोसायटी कार्यालयाजवळील दर्गाह परीसरातील विहिरीचीही सफाई करत, या विहिरीला जाळी बसवून तेथे दोन ठिकाणचे पाणी एकत्रीकरण करून साठवण करण्यास आरंभ केला.

या पाण्याला जोड देण्यासाठी गोविंदसागर येथून येणार्‍या पाईपलाईनचे चोरीला गेलेले सहा एअर व्हॉल्व नव्याने बसविण्यात आले. या योजनेच्या मुख्यवाहिनीला असलेले अनेक अनधिकृत कनेक्शन कट करून येथील मुख्य वाहिनीचे लिकेज काढून या भारत निर्माण योजनेचे पाणी दर्गाह जवळील विहिरीत टाकण्यात आले. तेथून इंदिरानगरसह पूर्ण गावास दररोज पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिल्याने खर्‍या अर्थाने या गावची पाणीटंचाई दूर झाली. या एकत्रीकरणामुळे आता गावास दररोज पाणी उपलब्ध करून दिले जात आहे. या कामी विद्यमान सरपंच, उपसरपंचासह सदस्य मंडळाचे विशेष सहकार्य लाभल्याचे यावेळी राजू चक्रनारायण यांनी सांगितले.

मात्र, हे सर्व करत असताना दोन्ही योजनांसाठी महत्वाचा दुवा पाटबंधारे विभागाने यावर्षीही ग्रामस्थांना ठेंगा दाखविला. सध्या सुरू असलेल्या आवर्तनातून प्रवरा नदीवरील केटीवेअरला पाणी दिले, पण गावच्या पिण्याच्या पाण्याची योजना असलेल्या गावतळ्यात पाणी दिले नाही. गोविंदसागरमध्येही पाणी न सोडल्याने एकप्रकारे ऐन उन्हाळ्यात गावास वेठीस धरण्याचा प्रयत्न पाटबंधारे विभागाने केला आहे. त्यामुळे पाटबंधारे विभागाबाबत खोकर ग्रामस्थांत तीव्र नाराजी दिसत आहे. यात वरिष्ठस्तरावरून लक्ष घातल्यास खोकरसह अनेक गावांना पिण्याचे पाणी मिळू शकते.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या