श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
कामोठे नवी मुंबई येथून अपहृत केलेल्या बालकाची अहिल्यानगर व श्रीरामपूर शहर पोलिसांनी आठ तासांत सुखरुप सुटका केली असून याप्रकरणी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विलास रामू इंगळे, अक्षय आबासाहेब म्हस्के, बाबासाहेब चिनप्पा पोळमाळी, कैलास रामू इंगळे, प्रसाद गंगाधर कुटे सर्व रा.कुकाणा ता. नेवासा अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
दि. 26 डिसेंबर रोजी सकाळी 8 वाजेच्या सुमारास मोरे हॉस्पिटल पाठील मागील मैदान, मोठाखांदा कामोठे ता. पनवेल, नवी मुंबई येथून सात वर्ष वयाच्या बालकाची काही अज्ञात इसमांनी फूस लावून पळवून नेल्याबाबत बालकाच्या आईने फिर्याद दिली होती. त्यावरून कामोठे पोलीस स्टेशन नवी मुंबई येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हा गंभीर स्वरुपाचा असल्याने नमुद बालकाचा शोध घेण्यासाठी नवी मुंबई पोलिसांतर्फे सर्व महाराष्ट्रातील पोलीस नियंत्रण कक्षांना कळविण्यात आले होते. या अपहृत बालकास घेऊन अपहरणकर्ते हे अहिल्यानगर जिल्ह्यात येण्याची दाट शक्यता असल्याबाबत पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांना उपपोलीस आयुक्त रश्मी नांदेडकर यांनी कळविले होते. त्यानुसार अहिल्यानगर जिल्ह्यात अपहृत बालकाचा व अपहरणकर्ते यांचा शोध घेण्याबाबत पोलीस अधिक्षकांनी सर्व पोलीस ठाण्यांना तसेच स्थानिक गुन्हे शाखेस आदेशित केले.
तांत्रिक माहितीच्या आधारे नमुद अपहरणकर्ते हे संगमनेर रोडने नेवासेच्या दिशेने जात असल्याबाबत माहिती प्राप्त झाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर व श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोसई रोशन निकम, पोलीस कॉन्स्टेबल संभाजी खरात, रामेश्वर तारडे, अजित पटारे यांच्या संयुक्त पथकाने नाकाबंदी तसेच पाठलाग करून अपहरणकर्ते हे अपहृत बालकास घेऊन जात असलेली इटोंगा गाडीही श्रीरामूपर तालुक्यातील टाकळीभान येथे अडवून त्यातील अपहृत बालकाची सुखरुप सुटका करून आरोपींना ताब्यात घेतले. सदरची कारवाई पोलीस निरीक्षक दिनेश आहेर, पोलीस निरीक्षक नितीन देशमुख, पोलीस उपनिरीक्षक रोशन निकम, पोलीस कॉन्स्टेबल संभाजी खरात, रामेश्वर तारडे, अजित पटारे तसेच स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर पथकाचे पोलीस कॉन्स्टेबल शिंदे, पोलीस नाईक दरदले, पोलीस कॉन्स्टेबल शिरसाठ, श्री. ससाणे, पोलीस नाईक सचिन धनाड, पोलीस कॉन्स्टेबल रामेश्वर वेताळ यांनी केली