नाशिक | प्रतिनिधी
सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या पार्श्वभूमीवर नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा समृद्ध धार्मिक व सांस्कृतिक वारसा देशभर पोहोचवण्यासाठी भारतीय टपाल विभागाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. माय स्टॅम्प उपक्रमांतर्गत पवित्र रामकुंड आणि कुशावर्त तीर्थ या दोन प्रमुख स्थळांवर आधारित विशेष टपाल तिकिटांची निर्मिती करण्यात आली आहे. येत्या ३१ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या सिंहस्थ महाकुंभ ध्वजारोहण सोहळ्यात या तिकिटांचे अधिकृत अनावरण केले जाईल.
वैष्णव परंपरेचे प्रतीक (रामकुंड): नाशिकमधील रामकुंड हे वैष्णव संप्रदायाचे प्रमुख स्नानस्थळ मानले जाते. टपाल तिकिटावर रामतीर्थाची ऐतिहासिक वास्तुरचना आणि सिंहस्थातील अमृतस्नान परंपरेचे अतूट नाते प्रभावीपणे चित्रित करण्यात आले आहे.
शैव परंपरेचा वारसा (कुशावर्त तीर्थ): त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त तीर्थ हे शैव साधू-संतांच्या शाही स्नानाचे केंद्र आहे. या तिकिटावर कुशावर्त तीर्थाची वास्तुरचना आणि पार्श्वभूमीवरील ब्रह्मगिरी पर्वतरांगेचे धार्मिक व नैसर्गिक सौंदर्य साकारण्यात आले आहे.
आध्यात्मिक संगमः वैष्णव आणि शैव अशा दोन्ही प्रमुख परंपरांना एकाच उपक्रमातून टपाल तिकिटांच्या स्वरूपात राष्ट्रीय स्तरावर ओळख मिळणार आहे.




